मुलाखत ; सोलापुरच्या विकासासाठी राजकीय-शासकीय पुढाकारही हवा - यतीन शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:14 PM2018-10-23T16:14:23+5:302018-10-23T16:21:34+5:30
प्रिसिजन उद्योग समुह कंपनीचे संचालक यतीन शहा यांच्याबरोबर सोलापुरातील उद्योग क्षेत्राविषयी साधलेला हा संवाद.
सोलापूर : सोलापूरातच नव्हे तर जगप्रसिध्द असलेल्या सोलापुरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट्सने उद्योग क्षेत्रात अनेक शिखरे पादाक्रांत केलेली आहेत़ चीन, जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशात प्रिसिजन उद्योग समुहाने उद्योगाचे जाळे निर्माण केले. प्रिसिजन उद्योग समुह कंपनीचे संचालक यतीन शहा यांच्याबरोबर सोलापुरातील उद्योग क्षेत्राविषयी साधलेला हा संवाद.
प्रश्न : सोलापुरातील उद्योगाविषयी काय सांगाल ?
उत्तर : सोलापूरचे मार्केटिंग करायचे झाले की येथील चादर, शेंगा चटणी, कडक भाकरींचीच चर्चा आधी होते. खरे तर या गोष्टी जुन्या झाल्या. शहराचा औद्योगिक विकास करायचा असेल तर बाहेरच्या उद्योजकांना हे दाखवून चालणार नाही.
प्रश्न : सोलापुरात बाहेरील उद्योग येत नाहीत ?
उत्तर : सोलापुरात उद्योग निर्मितीला पोषक वातावरण आहे़ मनुष्यबळ तसेच रोजगाराच्या दृष्टीने सोलापूरात चांगले वातावरण आहे़ शहरात दाखविण्यासारखे आणि सांगण्यासारखे बरेच काही आहे. मात्र त्यासाठी राजकीय मंडळींचा आणि प्रशासनातील अधिकाºयांचा पुढाकार हवा़ तरच सोलापुरात बाहेरील राज्य तसेच देशातील उद्योग येण्यास अडचण असणार नाही.
प्रश्न : सोलापुरातील सुविधाबाबत काय सांगाल ?
उत्तर : .केवळ आठ-दहा जणांनी काम करून चालणार नाही. सर्वांचाच हातभार यात हवा आहे. सर्वसमावेशी प्लॅटफॉर्म उभारण्याची आवश्यकता आहे. ज्या सुविधा पुण्यात नाहीत, त्या सोलापुरात सहज उद्योजकांना मिळवून देता येतील. पुण्यात जागेची मोठी अडचण आहे. सोलापुरात मुबलक जागा आहे. मनुष्यबळही आहे. कोल्हापुरात उद्योजकांचे सर्व बाजूंनी स्वागत केले जाते. त्याचा अभाव सोलापुरात दिसतो. त्याची कारणे शोधण्याची गरज आहे.
प्रश्न : उद्योजक सोलापुरात येण्यासाठी आपण काय कराल ?
उत्तर : सोलापुर सारख्या शहरात आयटी इंडस्ट्रीज यावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र अन्य तांत्रिक बाजू दुबळ्या आहेत. विमानतळ, दळणवळणाची कनेक्टिव्हिटी, प्रभावी दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवा यात आपण मागे आहोत, याचा विचार करायला हवा. अन्य मोठ्या उद्योजकांनी येथे यावे, यासाठी प्रिसिजनच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक उद्योजकांनीही यासाठी पुढाकार घेतल्याशिवाय यश येणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.