अंधश्रद्धा बाजूला सारून नेत्रदान अन् अवयवदानासाठी पुढे या: तात्याराव लहाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:08 PM2019-01-11T13:08:31+5:302019-01-11T13:13:07+5:30
सुशिक्षित लोकांनी नेत्रदान व अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. श्रीलंकेत भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने नेत्रदान केले जाते असेही त्यांनी सांगितले.
माढा : आपण अंधश्रद्धेमुळे अवयवदान, नेत्रदान, देहदान करत नाही. वास्तविक पाहता आपल्या मृत्युनंतर मौल्यवान अवयव जाळून टाकतो. त्यापेक्षा नेत्रदान केल्यास दोघांना दृष्टी मिळेल. आपणांमध्ये असलेली सर्व अंधश्रद्धा बाजूला सारा. समाजातील अन्य जीवित गरजूंच्या मानवीय सेवेसाठी नेत्रदान व अवयवदानासाठी पुढे या, इतरांनाही यासाठी प्रेरित करा, असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
माढा येथील माढेश्वरी बँकेने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन समारंभानंतर त्यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.
अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळाले आहे. माझ्या आईने पंचवीस वर्षांपूर्वी मला स्वत:ची किडनी दिल्याने मी आज हे काम करू शकतो. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी नेत्रदान व अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. श्रीलंकेत भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने नेत्रदान केले जाते असेही त्यांनी सांगितले.
माणसाला मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय मोठे होता येत नाही. सामान्यातून मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, असेही ते म्हणाले. जंकफूड आपल्या शरीरासाठी घातक आहे. आपल्या जिभेला लगाम घाला आणि जंकफूड टाळा. भाकरी, भाजी खा आणि भरपूर आयुष्य जगा, असा संकल्प या नवीन वर्षात करा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोड पदार्थ टाळा. रोज व्यायाम करा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खा. औषधे टाकल्याने डोळे खराब होतात. सकाळ-संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आपल्या पाल्यांचे डोळे आपण खराब करत आहोत. सहा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा रडू लागला की, त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात पालक मोबाइल देतात. तो रडतो म्हणून मोबाइल देणे म्हणजे त्याच्या डोळ्यांचे नुकसान करणे. दिवसभर मोबाइल पाहिल्याने एक डोळा अधू होतो. घरात आल्यावर मोबाइल बंद करा, असा सल्ला त्यांनी दिला.