तपास अधिकारी झाले रिटायर, जाताना म्हणाले धीर धरा यातून कोणी सुटणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:59+5:302021-08-01T04:21:59+5:30
मोहोळ : मोहोळ डबल मर्डर प्रकरणातील तपास अधिकारी शनिवारी निवृत्त झाले. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. ...
मोहोळ : मोहोळ डबल मर्डर प्रकरणातील तपास अधिकारी शनिवारी निवृत्त झाले. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी त्यांनी आम्ही भक्कम पुरावे गोळा केले आहेत. आगामी काळातही तपास योग्य दिशेनेच असेल, धीर धरा यातून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही तपास करणारे मावळते पोलीस उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी मयतांच्या नातेवाईकांना दिली. यात या प्रकरणाचा तपास कोणाकडे जाणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
तपासात पोलिसांच्या हाती आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत. जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकात पोलिसांची पथके शोध घेत आहेत. लवकरच आरोपी सापडतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
पोलीस खात्यात गेली अनेक वर्षे सेवा केलेल्या शिंदे यांचा सेवेचा कार्यकाल ३१ जुलै २०२१ रोजी संपला. त्यानिमित्त मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी प्रभाकर शिंदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. घटना घडून १५ दिवस उलटून गेले तरी एकही आरोपी सापडला नाही. आम्हाला न्याय द्या, आरोपींना पकडा, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या नातेवाईकांची चौकशी करा, अशी मागणी केली. यावेळी तपासी अधिकारी शिंदे यांनी फरार आरोपी पकडले गेले नसले तरी, लवकरच त्यांना पकडले जाईल. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असे भक्कम पुरावे आम्ही गोळा केले असल्याचे सांगत धीर धरा, असे आवाहन मृतांच्या नातेवाईकांना केले.
-----
या गुन्ह्यातील अटकेत असलेला टेम्पोचालक भैय्या असवले याच्या विरोधात अनुसूचित जाती कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्याकडे वर्ग केला होता. त्यांनी आरोपीच्या नातेवाईकासह संपर्कातील मंडळीकडे पोलीस पथके पाठवून आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, या गुन्ह्यातील फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे नगर परिषदेच्या रमाई घरकूल योजनेची कागदपत्रे शिवाय बोगस मतदार नोंदणी या अनुषंगाने कागदपत्रे हस्तगत केली आहेत. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तांत्रिक बाबींचा अवलंब करुन तपास चालू आहे. दरम्यान, ३१ जुलै रोजी प्रभाकर शिंदे हे सेवानिवृत्त झाल्याने आता हा तपास कोणाकडे जाणार याकडे नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
-----
नातेवाईकांसोबत बोलताना पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर.
----