जानेवारीमधील श्रीशैल जगद्गुरूंच्या पीठारोहण सोहळ्याचे पंतप्रधानांना आमंत्रण
By Appasaheb.patil | Published: October 19, 2022 05:34 PM2022-10-19T17:34:27+5:302022-10-19T17:34:38+5:30
दि. १० ते १५ जानेवारी २०२३ या पाच दिवसीय महासंमेलनादरम्यान मोदी हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर : श्रीशैल सूर्यसिंहासन महापीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य भागवतपाद यांचा जानेवारीमध्ये श्रीशैल येथे द्वादश पीठारोहण महोत्सव आणि जन्म सुवर्णमहोत्सव होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः जगद्गुरूंनी दिल्याचे मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.
दि. १० ते १५ जानेवारी २०२३ या पाच दिवसीय महासंमेलनादरम्यान मोदी हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. श्रीशैल जगद्गुरू म्हणाले की, देशातील ज्योतिर्लिंग क्षेत्र एकामागून एक विकसित होत आहेत. ही आनंदाची बाब आहे आणि श्रीशैल येथे पंतप्रधानांच्या आगमनाने श्रीशैल क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची घोषणा होईल.
बेळगाव जिल्ह्यातील सुक्षेत्र येडूर ते श्रीशैल महाक्षेत्र अशा २९ ते ३३ दिवसांच्या कालावधीत श्रीशैल जगद्गुरू यांनी ५६० किलोमीटर पदयात्रा करणार आहेत. त्यानंतर ४२ दिवस श्रीशैल येथे अनुष्ठानही करणार आहेत. शेवटी १० ते १५ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. मोदी यांना निमंत्रण देताना औसा येथील डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य, श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.