महिलांच्या संमतीनेच रात्रपाळीत कामावर बोलवा ! दुकाने, आस्थापनेसाठी नवीन नियम, किमान तीन महिला सहकारी असणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:42 PM2018-02-10T12:42:42+5:302018-02-10T12:45:43+5:30
महाराष्टÑ शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने दुकाने आणि आस्थापनेसंदर्भातील नवीन नियम जारी केले असून, महिला कामगारांना रात्रपाळीत कामावर बोलाविण्यासंदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : महाराष्टÑ शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने दुकाने आणि आस्थापनेसंदर्भातील नवीन नियम जारी केले असून, महिला कामगारांना रात्रपाळीत कामावर बोलाविण्यासंदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यानुसार आता महिला कामगारांना त्यांच्या संमतीनुसारच रात्री ९.३० ते सकाळी ७ यावेळेत कामावर ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र यावेळेत किमान तीन महिला सहकारी उपस्थित असणे बंधनकारक आहे.
यापूर्वी मार्च २०१५ मध्ये निघालेल्या अधिसूचनेनुसार महिला कामगारांना रात्री साडेनऊनंतर कामावर बोलावू नये, असे नियमामध्ये स्पष्ट केले होते. २ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत महिला कामगारांना रात्रीपाळीत कामावर बोलाविण्यासंदर्भात दहा नियम जारी करण्यात आलेले आहेत. रात्रपाळीमध्ये काम करणारी महिला कामगार कामाच्या ठिकाणी जेथे वावर करणार आहे; तेथे योग्य दिवे आणि प्रकाशयोजना असणे सक्तीचे आहे. प्रसाधनगृहही सुरक्षित हवे. ते सुरक्षित असावे आणि आतून कडी लावण्याची सुविधा असली पाहिजे. शिवाय गरजेनुसार सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यात यावेत, असेही या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही महिला कामगारास दिवसपाळीतून रात्रपाळीत आणि रात्रपाळीतून दिवसपाळीत बदली करताना मागील पाळी व रात्रीपाळी यामध्ये किमान बारा तास विश्रांतीचा वेळ असला पाहिजे.
उद्योग व कामगार विभागाने अन्य कामगारासंदर्भातही नियमावली जारी केली असून, नियमांचा मसुदा ‘महाकामगार डॉट महाराष्टÑ डॉट गव्ह डॉट इन’वर उपलब्ध आहे.
-------------------------
सुरक्षित वाहतूक व्यवस्था...
- सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रपाळीत काम करणाºया महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणाहून घराच्या दारापर्यंत तसेच घराच्या दारापासून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षित व सुस्थितीत असलेली स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. आस्थापना मालकाकडे, त्याने स्वत:हून कामावर ठेवलेल्या किंवा कोणत्याही एजन्सी ठेकेदारामार्फत कामावर ठेवलेल्या वाहन चालक, सुरक्षा रक्षक आणि सर्व कर्मचाºयांचा तपशील असावा तसेच महिलांना ने-आण करणाºया सर्व कामगारांची चारित्र्य पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.