अपूर्ण कामाची धूळ देतेय अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:08+5:302021-01-03T04:23:08+5:30
दीड वर्षांपूर्वी श्रीसंत एकनाथ महाराज पालखी मार्गातून करकंबपासून नेमतवाडीकडे उजनी कालव्यापर्यंत साधारण अडीच कि.मी. डांबरीकरणाचे काम झाले आहे; परंतु ...
दीड वर्षांपूर्वी श्रीसंत एकनाथ महाराज पालखी मार्गातून करकंबपासून नेमतवाडीकडे उजनी कालव्यापर्यंत साधारण अडीच कि.मी. डांबरीकरणाचे काम झाले आहे; परंतु अडीच कि.मी. अंतराच्या रस्त्यावर मध्येच डांबरीकरणाचे काम दीड वर्षांपासून अपुरे ठेवण्याचा प्रताप संबंधित ठेकेदारांनी केला आहे. याचा नाहक त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मागील दीड वर्षांपासून काम अपुरे असताना याकडे ठेकेदारासह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांमधून उलट-सुलट चर्चा
करकंब ते नेमतवाडी हा रस्ता अकलूजला जोडलेला असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची व प्रवाशांची मोठी रहदारी असते.
मागील आठवड्यातच रस्त्यावरून मोठे वाहन वेगाने गेल्यामुळे अपुऱ्या कामाच्या ठिकाणी धुराच्या पसरलेल्या लोटामुळे मोटरसायकल चालकाला समोरून येणारा ट्रॅक्टर न दिसल्यामुळे मोटरसायकल चालक आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. दैव बलवत्तर म्हणून मोटरसायकल चालक केवळ गंभीर जखमी झाला. या अपघाताला नेमके जबाबदार कोण, याबाबत प्रवाशांमधून उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
कोट :::::::::::::::::::::::::
मागील दीड वर्षांपासून अपुऱ्या राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात घडू लागले आहेत. काम त्वरित पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरू.
-राजू शेटे
प्रवासी
कोट :::::::::::::::::::
संबंधित अपुऱ्या रस्त्याचे काम १० ते १५ दिवसांत पूर्ण करू, तोपर्यंत संबंधित ठेकेदारास अपुऱ्या कामावर पाणी मारण्याचे सांगू, जेणेकरून प्रवाशांना अडचण निर्माण होणार नाही.
- हनुमंत बागल
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर