माण नदी स्वच्छता, पुनरुज्जीवन कार्यात नाम फाउंडेशनचाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:10+5:302021-05-05T04:37:10+5:30
राजेवाडी साखर कारखान्याचे चेअरमन शेषगिरीराव, माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, आटपाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, मंगळवेढा अर्बन ...
राजेवाडी साखर कारखान्याचे चेअरमन शेषगिरीराव, माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, आटपाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील, मंगळवेढा अर्बन बँकेचे संचालक उत्तमराव खांडेकर, नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक दत्ता खरात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक राजाभाऊ वाघमारे, यांच्या हस्ते पोकलेन मशीनचे पूजन करून कामाला सुरुवात केली.
गेल्या सहा वर्षांपासून माण नदी पुनरुज्जीवनाचे काम सुरू असून, आतापर्यंत सांगोला, आटपाडी तालुक्यातील ५० कि.मी. नदीपात्र, १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे स्वच्छ केले आहेत. चालू वर्षात राजेवाडी कारखान्याने १६ कि.मी. नदीपात्र व चार कोल्हापूर पद्धतीचे बंधारे स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे.
माण नदी पुनरुज्जीवित होऊन वाहती झाल्यास माणदेशातील व महाराष्ट्रातील नैसर्गिक स्रोताचे, जलसंवर्धनाचे सर्वांत मोठे काम असणार आहे. म्हणूनच या विविध संस्थांना एकत्र आणण्याचे काम नामचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक गणेश थोरात, सोलापूर जिल्हा समन्वयक दत्ता खरात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक राजाभाऊ वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी लोटेवाडीचे सरपंच विजय खांडेकर, सचिन खटके, विठ्ठल काळे, डी.डी. कदम, विश्वजित कदम, रामभाऊ लवटे, ज्ञानेश्वर तंडे आदी उपस्थित होते.