धान्य वाटपात अनियमितता; माढा, करमाळ्यातील दुकानदारांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:36 AM2020-04-17T10:36:00+5:302020-04-17T10:37:28+5:30
ज्यादा दराने धान्य वाटप; स्वस्त धान्य दुकानदारांबाबतच्या तक्रारी वाढल्या
माढा/करमाळा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊच्या काळात स्वस्त धान्य दुकानदार आपली भूमिका व्यवस्थित राबवत नसल्याचे लक्षात पुरवठा विभागाच्या लक्षात येत आहे. यावर कठोर पावले उचलली जात आहेत. माढा तालुक्यातील पिंपळनेर दोन आणि करमाळा तालुक्यातील कुगाव येथील एक अशा तीन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
माढा तालुक्यातील दोन स्वस्त धान्य दुकानात अनियमितता दिसून येताच एक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला तर दुसरा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील पी़ एस़ लोकरे स्वस्त धान्य दुकान व गंगामाई महिला बचत गट या दोन स्वस्त धान्य दुकानाबाबत धान्य वाटपाच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या़ या दुकानांची तपासणी करण्यात आली़ चौकशीअंती या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात आला होता़ या दुकानाबाबत धान्य वाटपातील अनियमितता व योजनेतील पात्र लाभार्थी व्यतिरिक्त इतर शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने गंगामाई महिला बचत गट (पिंपळनेर) या दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला़ तसेच पी. एस. लोकरे या दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर यांनी दिला आहे.
अन्यथा अन्नसुरक्षा अधिनियमान्वये कारवाई
- माढा तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार यांनी पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित व विनातक्रार धान्याचे वाटप करावे अशा सूचना होत्या़ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या तक्रारी येणार नाहीत व पात्र लाभार्थी अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित रास्त भाव धान्य दुकानदाराविरुद्ध राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश माढा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिला आहे.
लॉकडाऊन काळात जास्त पैसे घेऊन दिले धान्य
लॉकडाऊनच्या काळात जास्त पैसे घेऊन कमी धान्याचे वाटप केल्याप्रकरणी तहसीलदार समीर माने यांनी कुगाव (ता.करमाळा) येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला़ याबरोबरच सोमवारी दुकान सील करण्यात आले. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे़ या कालावधीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. करमाळा तालुक्यात कुगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून जास्तीचे पैसे घेऊन कमी माल देत असल्याची तक्रार दोघा शिधापत्रिकाधारकांनी केली होती़ त्यावरून तहसीलदार समीर माने यांनी चौकशी करून नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडलाधिकारी रेवन्नाथ वळेकर यांना कुगाव येथे पाठवून सोमवारी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला़ तसेच दुकानास सील ठोक ठोकले आहे. हा परवाना रद्द केल्याने आता कुगावचे स्वस्त धान्य दुकान शेटफळ येथील स्वस्त धान्य दुकानदारास तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यासाठी देण्यात आले आहे.