संभाजीराजेंच्या डोळ्यात समाजाचं नेतृत्व खुपतंय का? तानाजी सावंत गटाचा पलटवार
By राकेश कदम | Published: March 29, 2023 11:54 AM2023-03-29T11:54:10+5:302023-03-29T11:55:07+5:30
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एक महिन्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम आरोग्य केंद्राला भेट दिली होती
सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे संवेदनाहीन आहेत. त्यांचा तत्काळ राजीनामा घ्या, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी केली. यावर, डॉ. सावंत हे समाजाचे कर्तृत्वान नेतृत्व आहे. हे नेतृत्व तुमच्या डोळ्यात खुपतंय का, असा पलटवार सावंत गटाने बुधवारी केला.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एक महिन्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम आरोग्य केंद्राला भेट दिली होती. या आरोग्य केंद्राची दुरवस्था अजूनही दूर झालेली नाही. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती 'जैसे थे' आहे, इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा संवेदनाहीन व मग्रूर मंत्र्याचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी मंगळवारी केली. याचे पडसाद धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातही उमटले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंत गटाचे सोलापूर जिल्ह्यातील नेते अमोल शिंदे म्हणाले, भूम, परंडा या भागातील आरोग्य केंद्र सुधारणांचे सरकार पातळीवर सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्यमंत्रीचा पदभार आला. केवळ भूम, परंडा नव्हे तर राज्यातील सर्व आरोग्य केंद्र सुधारण्याचे काम सावंत यांच्याकडून होईल. आरोग्य विभागात पारदर्शक कारभार सुरू आहे.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांची वाटचाल राजकीय पक्ष काढण्याच्या दिशेने सुरू आहे. राजकीय दृष्टिकोनातून ते या विषयावर टीका करीत आहेत. डॉ. तानाजी सावंत हे मराठा नेतृत्व त्यांच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे ते बोलत असावेत, असे वाटते. डॉ. सावंत यांनी मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मदत केली. विविध संस्थांच्या माध्यमातून २५ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. समाजातील अशा नेतृत्वाला संवेदनाहीन म्हणणे चुकीचे आहे. जे काम सरकार पातळीवर आहे ते होईल. त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे.