सोलापुरात गणपती बाप्पांच्या डोळ्यातून येतंय पाणी? जाणून घ्या व्हायरल सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:49 PM2022-08-24T17:49:35+5:302022-08-24T17:58:32+5:30
कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेनक गणपती मंदिर आहे.
सोलापूर : शहरातील होटगी -कुंभारी रोडवरील गणपती मंदिरातील गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची बातमी मंगळवारी वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे या गपणपतीच्या डोळ्याजवळ पाण्याची ओलसर दिसणार छटाही व्हिडिओतून व्हायरल झाली आहे. त्यामुळे, भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. तसेच, हा दावा खोटा असल्याचंही अनिंसच्या फडतरे यांनी फेटाळला.
कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेनक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची अफवा हा हा म्हणता परिसरात पसरली. भाविकांनी तात्काळ मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले. दिवसभर एकच चर्चा सुरू झाली. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही अफवा असून यामागचे शास्त्रीय कारण काय याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल, असे स्पष्ट केले. मात्र, या चर्चेनं पुन्हा एकदा गणपती दूध पितो, या घटनेची आठवण करुन दिली.
सोलापूर - गणपतीच्या डोळ्यात पाणी येत असल्याच्या अफवेने दर्शनासाठी भक्तांची गर्दी, अनिंसने दावा फेटाळला pic.twitter.com/588veO4qop
— Lokmat (@lokmat) August 24, 2022
कोरोनाच्या काळातही अशा प्रकारची अफवा पसरली होती. मात्रत त्यात तथ्य नाही. मी प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी केली असता त्यावेळी असा प्रकार दिसला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नये.
- यशवंत फडतरे, जिल्हा कार्यवाह बुवाबाजी विरोधी पथक