रक्कम गोळा केली, मुली दाखवण्याचे मेळावे अन् तारखा देऊन सर्वांना लग्नाच्या नादी लावले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:31 PM2023-01-30T16:31:55+5:302023-01-30T16:37:19+5:30
सोलापूरमधील प्रकार....
बार्शी: गेली पाच महिन्यांपासून मुलाचा विवाह जमवून देण्यासाठी सुशिक्षित महिला वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जमवतो...मुली दाखवतो, असे सांगून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊनही मुली दाखविल्या नसल्याने बार्शी तालुका पोलिसांत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. २२ ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान घडला.
याबाबत दीपक गणपत खंडे (रा.अंबड, ता. माढा) याने तालुका पोलिसांत तक्रार देताच अंजली श्रीमंत धावणे (रा. सुभाषनगर, बार्शी), कैलास विठ्ठल नायकनदे (रा. पाटसांगवी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), रामा खैरे (रा. पचपिंपळ, ता. परांडा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तिघांनी मिळून सुशिक्षित महिला मराठा वधू-वर परिचय मेळावा नावाने अनधिकृत परवाना संस्था निर्माण केली व त्यांनी जवळ जवळ ३५० युवकांचे बायोडाटा घेऊन मुली दाखवतो, असे सांगून यांनी मोठ्या स्वरूपात रकमाही गोळा केल्या.
रक्कम गोळा केल्यानंतर विविध ठिकाणी मुलगी दाखविण्याचे मेळावे भरवून विवाहाच्या तारखा देऊन सर्वांना नादी लावले. दि. २८ जानेवारी रोजी बार्शी येथील किलचे मंगल कार्यालयात तिसरा मेळावा भरवला होता. वधू मिळणार म्हणून मोठ्या आशेने अनेक युवक व पालक सहभागी झाले होते. पण त्या ठिकाणी एकाही वधूचा पत्ता नव्हता. त्यासाठी आयोजकांनी पुढील तारीख दिल्याने याबाबत संशय आल्याने पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधून बोलावून घेतले.
वधू-वरांचे बायोडाटाच मिळाले नाहीत-
पोलिसांनी आयोजकांकडे चौकशी करत असताना वधू-वराचे बायोडाटा मिळाले नाहीत. त्यांनी फक्त पैसे मिळविण्याचा हेतूने हा प्रकार केल्याचा संशय येताच त्यांना ताब्यात घेतले, तर दिलेल्या फिर्यादीत २३ जणांची नावे टाकून यांचीही फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. पुढील तपास स. पो. फौजदार जनार्दन सिरसट करीत आहेत.