मौसम बेईमान! रात्री गारठा अन् दुपारी बसतोय चटका
By शीतलकुमार कांबळे | Published: January 25, 2024 06:42 PM2024-01-25T18:42:36+5:302024-01-25T18:43:49+5:30
मकर संक्रांतीनंतर शहरातील वातावरण बदलू लागले. थंडीचा जोर कमी होऊ लागला आणि ऊन वाढू लागले, असा अनुभव सोलापूरकरांना येत होता.
सोलापूर : उत्तर भारतामध्ये शीतलहरी आल्या आहेत, याचा परिणाम देशभरातील तापमानावर होत आहे. सोलापुरातील किमान तापमानात घट झाली असून, सकाळी - रात्री गारवा तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. गुरुवार २५ जानेवारी रोजी किमान तापमान हे १४.८ अंश सेल्सिअस इतके होते. रविवारपासून गुरुवारपर्यंत तापमानात ४ अंश सेल्सिअसची घट झाली.
मकर संक्रांतीनंतर शहरातील वातावरण बदलू लागले. थंडीचा जोर कमी होऊ लागला आणि ऊन वाढू लागले, असा अनुभव सोलापूरकरांना येत होता. मात्र, तीन दिवसांपासून वातावरणात पुन्हा बदल जाणवत आहे. पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतामध्ये येणाऱ्या शीतलहरीची स्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत सोलापूर शहरातील परिस्थितीही अशीच राहणार असून, वातावरणात गारवा राहणार आहे.
शहरात सकाळी आणि रात्री थंडी जरी पडत असली तरी सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मात्र उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारी १२ नंतर तर या चटक्यांच्या तीव्रतेमध्ये अधिक वाढ होत आहे. उन्हात फिरताना घाम जरी येत नसला तरी उन्हातून जाताना त्रास होत असल्याचा अनुभव सोलापूरकरांनी घेतला. येत्या काही दिवसांत अशीच परिस्थिती राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.