साेलापुरात बनावट दाखल्याचा उमेदवार देणे हे भाजपसाठी लांछनास्पद - सुशीलकुमार शिंदे
By राकेश कदम | Published: March 11, 2024 06:56 PM2024-03-11T18:56:44+5:302024-03-11T18:57:06+5:30
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपला साेलापूर लाेकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार मिळत नाही.
भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात बनावट दाखल्याचा उमेदवार देणे लांछनास्पद आहे. भाजपने लाेकशाहीची हेटाळणी करण्याचे काम करू नये, असे मत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी साेमवारी व्यक्त केले.
काँग्रेस भवनात नवे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांचा पदग्रहण समारंभ झाला. यानंतर त्यांनी ‘लाेकमत’शी संवाद साधला. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपला साेलापूर लाेकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार मिळत नाही. मागच्या निवडणुकीत भाजपने जाे उमेदवार दिला त्याच्याकडे जातीचा बनावट दाखला हाेता. त्यात त्यांची फसगत झाली. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाने बनावट दाखल्याचा उमेदवार द्यावा हे लांछनास्पद आहे. बनावट दाखल्याचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. भाजपचे लाेकच आता स्थानिक उमेदवार द्यावा. अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करीत आहेत. भाजपने लाेकशाहीची हेटाळणी करू नये.
काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी आमची इच्छा आहे. आम्ही आणि प्रदेशाध्यक्षांनी आमचे मत हायकमांडला कळविले आहे. आता हायकमांड जाे निर्णय देईल आम्ही त्यासाेबत राहू, असेही शिंदे म्हणाले. यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नराेटे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, अशपाक बळाेरगी आदी उपस्थित हाेते.
‘वंचित’साेबत बाेलणी सुरू
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबत महाविकास आघाडीतील नेत्यांची बाेलणी सुरू आहे. आघाडीकडून त्यांना बैठकीला बाेलावले जाते. यासंदर्भात लवकरच निर्णय हाेईल, असेही शिंदे म्हणाले.