गंभीर गुन्हे असलेल्यांना आरोप करणे शोभते का? सोलापूरातील भाजपा नेत्यांचा सवाल, काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:13 AM2018-02-22T09:13:33+5:302018-02-22T09:22:08+5:30
ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे, असा आरोप भाजपाचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आणि दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला.
माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर गंभीर आरोप केले. दोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या तालुकाध्यक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन काँग्रेस नेत्यांवर कारवाईची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपा नेते इंद्रजित पवार, नगरसेवक नागेश वल्याळ, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, लक्ष्मी कुरुड, सुभाष शेजवाल, संतोष भोसले, माजी सभापती संभाजी भडकुंबे, श्रीकांत ताकमोगे, श्रीमंत बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
रामप्पा चिवडशेट्टी म्हणाले, लोकमंगल ही आता एक चळवळ बनली आहे. सुभाष देशमुख त्याचे प्रवर्तक आहेत. ही चळवळ असंख्य लोकांचा आधार बनली आहे. शेतकºयांच्या प्रत्येक समस्येला लोकमंगलने पर्याय दिला आहे. नडलेल्यांना, आडलेल्यांची लग्ने, रिकाम्या हाताला काम, वृद्धांच्या रिकाम्या पोटाला वेळेवर देणारी लोकमंगल काँग्रेस नेत्यांची मुख्य अडचण ठरली आहे. त्यामुळे या नेत्यांचा राग हा भाजपावर कमी आणि लोकमंगलवर जास्त आहे. त्यांची गावोगावी असलेली मक्तेदारी या चळवळीने संपविली आहे. त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.