कुुर्डूवाडी परिसरात अर्धा तास विजांच्या कडकडाटात अवकाळी बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:23+5:302021-04-13T04:21:23+5:30
: कुर्डूवाडी शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर विजांचा ...
: कुर्डूवाडी शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
यामुळे कुर्डूवाडी शहरातील रस्ते चिखलमय झाल्याचे दिसून आले. अंतर्गत गटारींमुळे खोदलेले रस्ते अर्थवट स्थितीत राहिले असल्याने त्याचा फटका येथील नागरिकांना बसला. सायंकाळी कामावरून घराकडे जाताना अनेकांना त्यावरून घसरून पडावे लागले. मात्र, अवकाळी पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला एक वेगळाच गारवा येथील नागरिकांना अनुभवायला मिळाला.
सोमवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी शहरासह परिसरातील कुर्डू, लऊळ, भोसरे, घाटणे, भुताष्टे, चिंचगाव, बारलोणी, रोपळे, अंबाड, शिराळ, अकुलगाव, लव्हे, कव्हे गावात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात असलेल्या पिकांच्या नुकसानीचा सामना करावा लागला. पावसानंतर हवेत गारवा निर्माण झाला. साडेपाचला सुरू झालेला पाऊस सहा वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर कुर्डूवाडी व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.
----