पाऊस मनसोक्त बरसला.. ऊस सोडून सर्व पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:07+5:302021-07-24T04:15:07+5:30

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. यावर्षी जुलै महिन्यात पिकांना पाणी लागले ...

It rained profusely .. All crops except sugarcane were under water | पाऊस मनसोक्त बरसला.. ऊस सोडून सर्व पिके पाण्याखाली

पाऊस मनसोक्त बरसला.. ऊस सोडून सर्व पिके पाण्याखाली

Next

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. यावर्षी जुलै महिन्यात पिकांना पाणी लागले आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने खरीप पेरण्या झाल्या. आर्द्रा नक्षत्रात १० (२८ जून ते ६ जुलै) दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप पिके माना टाकू लागली होती. मात्र ७ जुलैला सुरू झालेला पाऊस थांबण्यास तयार नाही.

सलग १५ दिवस दररोज पाऊस पडत आहे.

गेल्या आठवड्यात दुपारपर्यंत कडक उन्ह पडत होते व दुपारनंतर पाऊस पडत होता; मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोज सतत पाऊस पडत आहे. दररोज पडणाऱ्या पावसाचे पाणी शोषून घेण्याची क्षमता जमिनीची राहिली नाही. त्यामुळे मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका, भुईमूग, मिरची, घेवडा, बाजरी तसेच इतर पिकांतील पाणी हटत नाही. यामुळे एकही पीक व्यवस्थित राहिले नाही. सध्या ऊस चांगला दिसत असला तरी ऊन नसल्याने उसाची वाढ ही थांबली आहे. असाच पाऊस काही दिवस राहिल्यास उसाचेही नुकसान होईल असे शेतकरी सांगतात.

गतवर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस पडला होता. यामुळे पिकांचे नुकसान झाले नव्हते. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तसेच ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके पाण्यात गेली होती. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी जुलै महिन्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

---

जनावरे आजारी पडतील

शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. तो बराच वेळ पडत होता. गोठा नसलेल्या जनावरांखालचा चिखल मागील १५ दिवसात हटलेला नाही. या पावसामुळे पिके तर गेलीच शिवाय जनावरेही आजारी पडतील असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

- विहिरी तुडुंब झाल्या असून सगळीकडे पाझर सुरू झाले आहेत. ओढे वाहू लागले आहेत. मात्र लहान- मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन पाण्याची गरज आहे.

- उत्तर तालुक्यात २३ जुलैपर्यंत २०७.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३१४.८ मि. मी. पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १५१.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

----

पावसाने उघडीप दिली व ऊन पडले तर काही पिके वाचतील अन्यथा एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. मागीलवर्षी प्रमाणेच याहीवर्षी खरीप व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी.

- अमोल पाटील

----

Web Title: It rained profusely .. All crops except sugarcane were under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.