परतीचा पाऊस चांगलाच बरसला..ओढे-नाले तुंडूब वाहू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:26 AM2021-09-24T04:26:16+5:302021-09-24T04:26:16+5:30
मागील दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसाच पाऊस यावर्षी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाळ्यातील पहिले एक-दोन महिने ...
मागील दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसाच पाऊस यावर्षी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाळ्यातील पहिले एक-दोन महिने अधूनमधून समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पाऊस अचानक गायब झाला. जिल्ह्याला वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातही समाधानकारक पाऊस न झाल्याने उजनी अद्याप १०० टक्केसाठी तहानलेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने पुनरागमन केले.
गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसाचा ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, ज्वारी लागवडीसाठी हा पाऊस उपयुक्त असून शेकडो हेक्टर पिकांना जीवदान मिळणार आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने पंढरपूर शहरासह भंडीशेगाव, वाखरी, गादेगाव, पळशी, सुपली, टाकळी, कासेगाव, भटुंबरे, गुरसाळे आदी गावांत शेतजमिनी व सखल भागात पाणी साठले होते. काही लहान-मोठे ओढे भरून वाहत होते. रस्त्यावरील माती वाहून गेल्याने खड्ड्यातील रस्ते आणखी खड्ड्यांत गेल्याचे दिसत होते. मात्र, या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
.............
प्रतीक्षा उजनीच्या शंभरीची
गेले दोन वर्षे ऑगस्टमध्ये उजनी धरण १०० टक्के भरून नदीला पूर आला होता. यावर्षी मात्र पावसाळा संपत आला तरी उजनी धरण ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान अडकले आहे. उजनी धरण भरल्यास पंढरपूर तालुक्यातील हजारो हेक्टर बागायती क्षेत्र, फळबागा, भाजीपाला, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे आता तालुक्यात जसा परतीचा पाऊस दमदार पडत आहे, तसाच पाऊस उजनीच्या कार्यक्षेत्रात पडून उजनी धरण लवकरात लवकर १०० टक्के भरावे, याकडे तालुक्यातील शेतकरी नागरिकांचे लक्ष लागले आहे.