वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:40 AM2021-11-09T07:40:17+5:302021-11-09T07:40:26+5:30
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे.
पंढरपूर : ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता चालणाऱ्या आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालखी मार्ग आणि १३ विविध महामार्ग प्रकल्पांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत राहू. यापूर्वी मी वारीचे स्वत: दर्शन घेतले आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीची हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली होती. विराट म्हणजे काय हे मला दिसले होते.
देहभान हरपून जाणे हे काय असते त्याचा अनुभव वारीच्या ठिकाणी येतो. वारकरी संप्रदायाने आपल्याला खूप काही दिले आहे. दिशा, संस्कृती दिली. प्रतिकूल कालखंडात अनेक शतके अनेक संकटे झेलून वारकरी संप्रदायाने आपली परंपरा कायम ठेवली. हे काम करण्यासाठी विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
रेल्वे पुलाचीही सुधारणा
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाइल्स बसविण्यात येणार आहेत. शिवाय वाखरी ते पंढरपूर हा रस्ताही मोठा करण्यात येणार असून, यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याच कामात रेल्वे पुलाची सुधारणाही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.