‘सिध्देश्वर’ची चिमणी पाडताना कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संचालकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:39 AM2019-12-10T11:39:21+5:302019-12-10T11:44:32+5:30
जिल्हाधिकाºयांची स्पष्टता: मनपाच्या तयारीवर नाराजी; पाहणी करण्याच्या सूचना
सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीचे पाडकाम करताना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कारखान्याचे संचालक आणि व्यवस्थापन यांची आहे. पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, नगर अभियंता संदीप कारंजे यांनी कारखानास्थळावर जाऊन पाहणी करावी. कारखान्याच्या संचालकांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल द्यावा. त्यानंतर मक्तेदाराला बोलावून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
चिमणीच्या पाडकाम तयारीचा आढावा घेण्यासाठी डॉ. भोसले यांनी सोमवारी दुपारी महापालिकेत बैठक घेतली. पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता रामचंद्र पेंटर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले, अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे, अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख नीलकंठ मठपती यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने काय तयारी केली? मक्तेदार कधी येणार आहे? चिमणीच्या पाडकामाला किती दिवस लागतील?, असा प्रश्न डॉ. भोसले यांनी उपस्थित केला. मक्तेदाराने सोलापुरात येण्यासाठी आणखी आठ दिवस मागितले आहेत.
महापालिकेची यंत्रणा त्याला मदत करेल. चिमणीच्या पाडकामाला किमान आठ दिवस लागतील. चिमणीमध्ये वरपर्यंत दोन फूट काँक्रीट आहे. ते तोडण्यासाठी वेळ लागेल. ते कशा पद्धतीने तोडायचे याबद्दलही जिल्हाधिकाºयांनी विचारले. मात्र या सर्व प्रश्नांवर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मनपाची अद्याप पूर्वतयारी नाही, तोपर्यंत मक्तेदाराला बोलावून काय करणार आहात? पोलीस प्रशासनासोबत कारखाना स्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी करा. तांत्रिक लोकांची बैठक घ्या. संचालक आणि व्यवस्थापनातील अधिकाºयांसोबत बैठक घ्या. त्यांच्यात समन्वय ठेवा, असे आदेशही डॉ. भोसले यांनी दिले.
चिमणीचे पाडकाम रोखण्यात यावे, यासाठी काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी शासनाला पत्रव्यवहार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून घेतला होता. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे.
अतिक्रमण विभाग प्रमुखांकडून बनवाबनवीची उत्तरे
- सध्या मनपाकडे किती लेबर आहेत, असे विचारल्यानंतर अतिक्रमण विभागाचे मठपती यांनी ३०० लेबर आहेत, असे उत्साही उत्तर दिले. मनपाकडे प्रत्यक्षात १८० च्या आसपास लेबर आहेत. त्यांना इतरही कामे असतात, असे उत्तर इतर अधिकाºयांकडून देण्यात आले. सध्या कारखान्यात दररोज १२०० टन उसाचे गाळप सुरू आहे. १० हजार टन उसाचे गाळप सुरू असताना चिमणीचा वापर होतो, असेही मठपती यांनी सांगितले. ही बनवाबनवीची उत्तरे ऐकल्यानंतर डॉ. भोसले यांना एकूण तयारीचा अंदाज आला. प्रत्यक्ष कारखाना स्थळावर जावा. अहवाल द्या, असे आदेश त्यांनी मनपा अधिकाºयांना दिले.
आठ दिवस २०० पोलीस कसे द्यायचे?
- चिमणीच्या पाडकामाला किमान आठ दिवस लागतील, असे मनपाकडून सांगितल्यानंतर पोलीस उपायुक्त बांगर यांनी एक मुद्दा उपस्थित केला. मागे चिमणी पाडताना १०० पोलीस लावण्यात आले. यावेळी जास्त बंदोबस्त लावावा लागेल. २०० पोलीस दिले तरी ते आठ दिवस त्याच भागात कसे ठेवायचे. सध्या पोलीस आयुक्त परगावी आहेत. ते १५ दिवसांनंतर येतील, या मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.