पदाधिकारी-आयुक्तांमधील शीतयुद्धामुळे सोलापूरची ‘स्मार्ट सिटी’ बैठक तहकूब करण्याची वेळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:41 PM2018-12-21T14:41:19+5:302018-12-21T14:42:52+5:30
महापौर, सभागृह नेते म्हणाले : तर बैठकीला गेलो असतो
सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी विरुद्ध मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनी (स्मार्ट सिटी) गुरुवारी आयोजित करण्यात आलेली बैठक कोरमअभावी तहकूब करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षातील गटनेत्यांसमवेत सल्लागार मंडळाची बैैठक झाली.
येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ९.३० वाजता स्मार्ट सिटी कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली होती. कंपनीमध्ये एकूण ११ संचालक नियुक्त करण्यात आले आहेत. बैठकीचा कोरम पूर्ण करण्यासाठी ५ सदस्यांची उपस्थिती गरजेची आहे. कंपनीचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव असीम गुप्ता आणि संचालक पी. सी. दसमाना यांनी शासकीय कामामुळे अनुपस्थित राहणार असल्याचा निरोप दिला होता.
पोलीस आयुक्त महादेव तांबडे रजेवर तर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले पर्यावरण मंत्र्यांच्या दौºयात व्यस्त होते. मनपा आयुक्त तथा कंपनीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे, निमंत्रित संचालक चंद्रशेखर पाटील, नरेंद्र काटीकर वेळेवर बैठकीला हजर राहिले. महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे उपस्थित राहिले असते तर बैठक झाली असती. पण या तीन नेत्यांनी दांडी मारली. पदाधिकाºयांच्या अनुपस्थितीबद्दल आयुक्तांना विचारल्यानंतर त्यांनी स्मितहास्य करीत भाष्य टाळले.
मिनी व मेजर गाळे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणारी विकास कामे या मुद्यावरुन मनपा पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये शितयुध्द सुरू आहे. या शितयुध्दामुळे पदाधिकाºयांनी बैठकीला जाणे टाळल्याची चर्चा आहे.
सल्लागार मंडळाने केल्या सूचना
स्मार्ट सिटी कंपनीची बैेठक तहकूब झाल्यानंतर सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीला बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी काही सूचना केल्या. स्मार्ट सिटी एरियात नव्याने भुयारी गटार योजनेचे काम करताना मोठे पाइप टाकले जाणार आहेत. हे पाइप आणि स्मार्ट एरियाबाहेरील पाइप यांची साइज सारखीच नसेल शहरात सांडपाणी तुंबू शकते. एलईडीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. सध्या स्मार्ट रोडचे काम पूर्ण होत आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. ते तातडीने सुरू करावे, अशी मागणी आनंद चंदनशिवे केली. त्यावर मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी हे हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याची सूचना नगर अभियंत्यांना केली. शिवराय-भीमराय बसस्टॉप ते शिवाजी चौक यादरम्यानच्या रस्त्याचे काम अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी चंदनशिवे यांनी केली.
नियमित पाणी पुरवठा, आरोग्य व्यवस्थेत सुधारणा यासारखी कामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अपेक्षित आहे. सध्या जी कामे सुरू आहेत त्यामुळे लोकांना त्रास होतोय. ही कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाºयांनी प्रयत्न करायला हवेत. उलट हे लोक बैठकीला दांडी मारत असत्यामुळे शहर विकासाचे तीन-तेरा होत आहेत.
श्रीदेवी फुलारे, नगरसेविका, काँग्रेस.
विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी बुधवारी रात्री पुण्यात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सभागृह नेते संजय कोळी, मनपा आयुक्त उपस्थित होते. कार्यक्रम रात्री उशिरा संपला. गुरुवारी आमच्या नातेवाईकाचा कार्यक्रमही होता. स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीला पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे समजले होते.
- शोभा बनशेट्टी, महापौर