५२ हजार गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेला लागले सलग २८ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 01:09 PM2020-09-03T13:09:15+5:302020-09-03T13:10:46+5:30
मंठाळकर खाणीत गणरायाला निरोप : मंगळवारी सकाळी ९ पासून बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते काम
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील शेकडो गणेशभक्तांनी यंदा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याला प्राधान्य दिल्याचे मंगळवारी दिसून आले. विशेष म्हणजे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजकांनी आपल्या घरातील गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. महापालिकेच्या वतीने मंठाळकर खाणीमध्ये सुमारे ५२ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितले.
शहराच्या प्रथम नागरिक महापौर श्रीकांचना यन्नम, त्यांचे पती रमेश यन्नम यांनी मंगळवारी सकाळी आपल्या घरी गणेश विसर्जन केले. सभागृह नेते श्रीनिवास करली यांनीही घरीच विसर्जन केले. मनपाच्या वतीने मूर्ती संकलनासाठी आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून १०९ संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती.
अनेक गणेशभक्तांनी या ठिकाणी गणेशमूर्ती सुपूर्द केल्या. मंठाळकर खाणीमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून मनपा कर्मचारी गणेश विसर्जन करीत होते. महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगर अभियंता संदीप कारंजे आदींनी या ठिकाणी भेट दिली.
पीओपीच्या मूर्तीचेही घरीच विसर्जन..
यंदाच्या वर्षी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्र्तींना सोलापूरकरांनी पसंती दिली. त्यामुळे घरीच श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करता आले. पण, असेही अनेक जण होते ज्यांना शाडूची मूर्ती मिळाली नाही, त्यांनी आपल्या पीओपीच्या मूर्तीदेखील घरीच विसर्जित केल्या. जुळे सोलापुरातील अनिल कोकाटे यांनी पाण्यामध्ये मूर्तीच्या वजनाइतका सोडा टाकून विसर्जन केले. यावेळी दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाच्या घरात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन पूजा झाली.
पोलिसांचा पहारा
प्रशासनाने तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यामुळे धर्मवीर संभाजी तलाव परिसरात पोलीस तैनात करण्यात आले. तीन ठिकाणी तंबू मारून पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. अगदी सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत तलाव परिसरात पोलिसांचा पहारा होता. तलावाच्या बॅकवॉटर परिसरात (सैनिक नगरच्या मागील बाजूस) देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही अपवाद वगळता तिथे मूर्ती विसर्जनासाठी कुणी आले नाही. जे काही लोक आले होते ते परतले.