पलटी झालेला सिमेंट टँकर काढण्यास लागले पाच तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:27 AM2021-09-09T04:27:32+5:302021-09-09T04:27:32+5:30
रविवारी घडलेल्या या घटनेचा उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. या घटनेत राहुल रामकिसन खिलारे (वय २५ वर्षे, ...
रविवारी घडलेल्या या घटनेचा उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. या घटनेत राहुल रामकिसन खिलारे (वय २५ वर्षे, रा. औंढा, जि. हिंगोली) या क्लिनरचा मृत्यू झाला. चालक शिवाजी कैलास कुटे (रा. औंढा) हा मात्र पळून गेला. अखेर पोलीसपाटील रूपाली इंगळे (रा. कर्जाळ) यांनी पोलिसात फिर्याद दिली. सदर टँकर शहाबादहून पुण्याकडे सिमेंट घेऊन जात होता. चालकाच्या निष्काळजीपणामुळेच आणि अचानक ब्रेक दाबल्याने चक्क रोडवरच टँकर पलटी झाला. या घटनेत सुधाकर बुधवंत नावाचा व्यक्ती जखमी झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीराम मोरे करीत आहेत.
----
काच फोडून काढला मृतदेह
घटनास्थळी अक्कलकोट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, उपनिरीक्षक मोतीराम मोरे, हवालदार कुमार घोडसे, महेश कुंभार, अंबादास दूधभाते, अंबादास कोल्हे व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. यानंतर मृतदेह टँकरचे केबिन फोडून क्रेनद्वारे बाहेर काढला. यासाठी तब्बल पाच तास लागले.
----
गेल्या दोन वर्षांपासून अक्कलकोट - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कर्जाळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथे सूचना फलकही लावलेला नाही. त्यामुळे चालक पुढे रस्ता असल्याचे समजून पुढे जात होता अन् नेमकी दुर्घटना घडली. चार दिवसांपूर्वीच हा रस्ता ये-जा करण्यासाठी खुला केला होता. मात्र शनिवारी उड्डाणपुलाची अपूर्ण कामे करण्यासाठी सूचना फलक न लावता रस्त्यावर मोठ-मोठे दगड, धोंडे व मुरुम टाकून रस्ता बंद केला गेला. त्यामुळे हा अपघात झाला. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी धोकादायक वळण आहेत. आतापर्यंत वळणावर बरेच अपघात घडलेले आहेत.
----०८अक्कलकोट- ॲक्सिडेंट
कर्जाळ, ता. अक्कलकोट येथे पलटी झालेल्या सिमेंट टँकर क्रेनच्या साहाय्याने मंगळवारी काढताना दिसत आहे.