पिकांना पाणी देणे झाले मुश्कील; रात्री बारानंतर येते लाइट; म्हणून शेतकऱ्यांची सुरू नाइट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 04:52 PM2022-01-21T16:52:58+5:302022-01-21T16:53:07+5:30
एकीकडे वीज वसुलीचा तगादा, दुसरीकडे पिके वाचविण्यासाठी धडपड
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : गेल्या पाच वर्षांनंतर प्रथमच यंदाच्या वर्षी रब्बी हंगामाला चांगले दिवस आले आहेत. मात्र, या दिवसांत वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कष्ट घेत असले तरी ‘लाइट’साठी शेतकऱ्यांना संपूर्ण ‘नाइट’ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव सुरू असल्याने बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता यावे, या दृष्टीने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
काही भागात अक्षरशः जीव मुठीत घेऊन शेतकरी अंधाऱ्या रात्रीत, कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देत असतात. यंदा निसर्गकृपेने पाणी भरपूर आहे. केवळ विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना देता येत नाही. रब्बीच्या पिकांसाठी महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागत, औषध फवारणी आदींवर केलेला खर्च, शिवाय सहकारी संस्था तसेच खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज डोळ्यांसमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी संकटातही शेताला पाणी द्यावे लागते. अशातच एखाद्या भागात ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. शिवाय थकबाकीअभावी अनेकांचा वीज पुरवठा बंद केला जात आहे. ऐन पिके बहारात असताना वीज बंद केल्याने अनेकांच्या शेतातील पिके जळून जात आहेत. त्यात रात्रीच्या विजेमुळे शेतकरी त्रस्त झाला असून केवळ वीज कंपनीमुळे शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला जाणार आहे.
- चंद्रकांत पाटील, शेतकरी.
हंगामी पिके जास्त पावसामुळे वाया गेल्याने आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न काढण्याची उमेद ठेवली आहे. मात्र, वीज पुरवठ्याअभावी या उत्पन्नालादेखील मुकावे लागते की काय, अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे भलेही गावात वीज पुरवठा नसला तरी चालेल; पण शेतीसाठी तरी सुरळीत वीज पुरवठा दिवसा द्यावा म्हणजे केलेले कष्ट वाया जाणार नाही.
- तुकाराम कदम, शेतकरी
शेतीपंपाच्या थकबाकीचा आलेख...
- विभाग - ग्राहक - थकबाकी (आकडे कोटीत)
- अकलूज - ४८ हजार ५३८ - ७४,७६९.७९
- बार्शी - १ लाख ८ हजार १५६ - १,६५,७१३.८१
- पंढरपूर - १ लाख ८ हजार ५८१ - १,५०,०३४.०७
- सोलापूर ग्रामीण - १ लाख २ हजार २६० - १,२९,५८१.८४
- सोलापूर शहर - ६०४ - ३०७.९२
-----------
रात्रभर शेतातच मुक्काम...
शेतीपंपाला वीज ही रात्री मिळते. प्रत्येक महिन्याला वेळेत बदल केला जातो. शिवाय प्रत्येक आठवड्याला वेळ बदलली जाते. दररोज ८ ते १० तास वीज शेतीपंपाला दिली जाते. मात्र ती रात्री दिली जात असल्याने शेतकरी महावितरणवर नाराज आहेत. रात्री ८ नंतर कोणत्याही वेळेला वीज शेतीसाठी उपलब्ध होते.