आयुष्याचा कोळसा होण्याची वेळ आली, मात्र माणुसकी धावून आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:50 PM2020-04-26T15:50:02+5:302020-04-26T15:51:59+5:30
मुंढेवाडीच्या रयत फाउंडेशनची कनेक्टीव्हिटी; ५० गरजूंना केली मदत अन् जागृती
वडवळ : त्यांचं जगण्याचं साधन म्हणजे कोळसा..चिलारी काटेरी झुडपे तोडायची... ती जाळायची अन् कोळसा तयार करून विकायचा.. पोट भरायचं.. मात्र कोरोनाच्या विळख्यात हा कोळसा देखील अडकला.. सगळंच ठप्प झालं... आता यांच्याच जीवनाचा कोळसा होण्याची वेळ आली होती, मात्र त्यांच्या मदतीला माणुसकी धावून आली अन् त्यांच्या चेहºयावरचं हास्य फुलले ..सगळीकडे संचारबंदी असली तरी ही माणुसकी मात्र कनेक्ट झाली...
मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे लोणावळा येथील ७ आदिवासी कुटुंब गेल्या वर्षभरापासून कोळसा कामगार म्हणून कार्यरत आहेत. येथील सर्व कामे उरकून ही कुटुंबं गावाला जायच्या तयारीत होती. तेवढ्यात या कोरोनामुळे हे सर्व कामगार या गावातच अडकून पडले. त्यांनी तयार केलेला माल कुठे विकता येईना. त्यांचा मालक (मुकादम) ही दळणवळणाचे साधन नसल्या कारणाने मुंढेवाडी येथे येऊ शकला नाही. त्यामुळे या कामगारांची जगण्याची पंचायत झाली. ही बाब गावातील रयत फाउंडेशन कार्यकर्त्यांच्या नजरेस आली. त्यांनी तत्काळ या ७ कुटुंबातील ५० सदस्यांसाठी आवश्यक ते किराणा साहित्य, भाजीपाला तर दिलाच मात्र या कोरोनाविषयी घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती देखील दिली.
सध्या हे सर्व कुटुंबीय शेतकºयांशी संपर्क साधून त्यांचे जळण तोडून देण्याचे काम करून आपला प्रपंच चालवत आहेत. रयत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डोंगरे, संतोष डोंगरे,सुनील व्यवहारे, राजू लिगाडे, किरण व्यवहारे, विजय व्यवहारे यांनी मात्र त्यांच्यासाठी हा मदतीचा हात दिला आहे.
अन्य मंडळीही मदतीसाठी सरसावली
तलाठी एम. एन. हकीम व मुंढेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व रेशन दुकानदार मोहन चौगुले यांनी स्वखर्चाने देखील प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन लागणाºया वस्तू पुरविल्या अशी कुटुंबं या ठिकाणी कायम वास्तव्यास राहण्यास नसतात त्यामुळे त्यांची रेशन कार्ड नसतात तरीही आम्ही स्वखर्चातून त्यांना जमेल ती मदत केली असल्याचे मोहन चौगुले यांनी सांगितले.
कोरोनामुळे सगळेच काही संपले असे नाही. आपण आपली माणुसकी मात्र जिवंत ठेवायला हवी. आमच्या गावातील या कुटुंबाची जमेल ती मदत आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहोत. याचे समाधान नक्कीच वेगळे आहे.
- श्रीकांत डोंगरे, अध्यक्ष, रयत फाउंडेशन, मुंढेवाडी