झटपट नोकरीच्या आशेनं वाढतोय ‘आयटीआय’कडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 04:27 PM2019-06-29T16:27:24+5:302019-06-29T16:30:49+5:30
सोलापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्यास एका जागेसाठी चार विद्यार्थ्यांकडून अर्ज
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : आयटीआयचा (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. याच अपेक्षेने अनेक विद्यार्थी हे दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेतात. सध्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू असून अनेक विद्यार्थी हे प्रवेश घेण्यासाठी अर्ज करत आहेत. मागील वर्षी ८२८ जागांसाठी ३१६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरासरी एका जागेसाठी चार विद्यार्थी अर्ज करतात; मात्र जागांची संंख्या मर्यादित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही.
राज्यातील विविध संस्थांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थी हे आयटीआयमध्ये येत आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा या राखीव आहेत, तर ३० टक्के जागांवर बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अभ्यासक्रम आणि उपलब्ध जागा
- वेल्डर - ४०, शिटमेटल वर्कर - ४०, फिटर- ६०, आॅपरेटर अॅडव्हान्स मशीन टूल्स- १६, टूल अँड डाय मेकर - २०, वेल्डर (जीएमएडब्लू-जीटीएडब्लू) - ४०, टर्नर ६४, मशिनिस्ट - ४८, मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स ४०, सुतारकाम- २४, फाउंड्रीमन - ४०, मेकॅनिक डिझेल- ४०, मोटर व्हेईकल मेकॅनिक- २०, वायरमन- २०, प्लंबर -२४, आरेखक यांत्रिकी- २०, आरेखक स्थापत्य - २४, वीजतंत्री- ८०, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन - २४, इलेक्ट्रिक मेकॅनिक्स - २४, इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स- २४, पेंटर - २०, ट्रॅक्टर मेकॅनिक- ४०, गवंडी- ४८, कॉम्प्युटर आॅपरेटर अँड प्रोगॅ्रमिंग असिस्टंट - ४८.
या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती
- विजापूर रोड येथील आयटीआयमध्ये २५ अभ्यासक्रम चालवले जातात. या २५ अभ्यासक्रमासाठी ८८८ जागांसाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट या अभ्यासक्रमांना विद्यार्थी पसंती देत आहेत.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा हे आधीच ठरवले होते. मला इलेक्ट्रिक कामाची आवड असल्याने वायरमन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे.
- शुभम इरकल, विद्यार्थी, सोलापूर.
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच नोकरी मिळत नाही. त्या तुलनेने आयटीआयच्या प्रशिक्षणानंतर नोकरी व व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत. यासोबतच आपल्याला एकप्रकारचे कौशल्यही अवगत होते.
- निखिल पाटील, विद्यार्थी, पाकणी.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यानंतर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय देखील सुरू करु शकतात. शासकीय आयटीआयमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात.
- ए. डी. गायकवाड,
प्रभारी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर