अजून वेळ गेली नाही, नाराजांनो, ‘एमआयएममध्ये परत या !’ अन्वर सादात यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 12:21 PM2021-08-30T12:21:23+5:302021-08-30T12:21:29+5:30
लाॅकडाऊनमध्ये आमदारांपेक्षा चांगले काम शाब्दींनी केले
साेलापूर : एमआयएम हा एक विचार आहे. वैयक्तिक वादापेक्षा हा विचार महत्त्वाचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आमच्यासाेबत या. आमच्यापैकी काेणीही तुमच्यावर नाराज हाेणार नाही, असे आवाहन एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांनी रविवारी केले.
महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पुन्हा मैदानात उतरला आहे. जिल्हा निरीक्षक अन्वर सादात, शहराध्यक्ष फारुक शाब्दी, गटनेते रियाज खरादी, नगरसेवक गाझी जहागिरदार, रेश्मा मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात आठ ठिकाणी कार्यक्रम पदयात्रा, उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आले. अन्वर सादात म्हणाले, काेराेनाच्या लाॅकडाऊनच्या काळात येथील आमदारांपेक्षा फारुक शाब्दी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. काही लाेक आमच्यापासून दूर जात आहेत. एमआयएम एक विचार घेऊन काम करीत आहे. आमच्यावर नाराज झालेल्या लाेकांनी परत यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या दाैऱ्यात युवक कार्याध्यक्ष माेईन शेख, गाझी जहागीरदार, माेहसीन मैंदर्गीकर व गटनेते रियाज खरादी यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी आयाेजित केलेल्या कार्यक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यात आले.
मी साेलापुरात दुकानदारी करीत नाही -शाब्दींचा टाेला
फारुक शाब्दी मुंबईत असतात. कधीतरी साेलापुरात येतात अशी टीका ताैफिक शेख यांनी केली हाेती. त्यावर शाब्दी म्हणाले, मी सामाजिक कामांसाठी साेलापुरात पूर्वीपासून येताेय. आता राजकारणाच्या निमित्ताने काम करताेय. मी साेलापुरात राजकारणाचा धंदा मांडला नाही. छक्के पंजे करीत नाही किंवा राजकारणाच्या नावावर दुकानदारी करीत नाही. मी तुमची मान शरमेने खाली जाऊ देणार नाही. काॅलर टाईट ठेवून दाखवेन.