‘जागर द ट्रॅव्हलिंग शो’२७ पासून
By admin | Published: January 21, 2015 11:44 PM2015-01-21T23:44:09+5:302015-01-21T23:55:20+5:30
पेन्सिल चित्रांची किमया : शशिकांत धोत्रे यांची जादूमय कला
कोल्हापूर : पेन्सिल चित्रांद्वारे सुरेख कलाकृती साधणारे चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या ‘जागर द ट्रॅव्हलिंग शो’ या चित्रप्रदर्शनाला
२७ तारखेपासून प्रारंभ होत आहे. धोत्रे यांनी स्वत: या प्रदर्शनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन संध्याकाळी ६ वाजता श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, डी. एम. कॉर्पोरेशनचे दिलीप मोहिते, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, अजय दळवी, जी. एस. माजगावकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. धोत्रे यांनी विविधरंगी पेन्सिलीने रेखाटलेल्या २० चित्रांचा समावेश आहे. चित्रकाराने कॅनव्हासवर तैलरंग काढल्याप्रमाणे भासावे, अशा सुंदर कलाकृती पेन्सिलच्या धारदार टोकातून निर्माण झाल्या आहेत. सुंदर चित्रांचे फक्त प्रदर्शन या उद्देशाने आयोजित या ‘ट्रॅव्हलिंग शो’च्या निमित्ताने ते देशभर भ्रमंती करणार आहेत. काळ्या रंगांवर थेटपणे चित्र निर्मिती करणे ही त्यांची खास शैली आहे. त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिचित्रे अद्वितीय अशी आहेत. या कालावधीत ते कोल्हापूरच्या संस्कृतीचाही अभ्यास करणार आहे. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ यावेळेत सुरू राहणार आहे.
दगड घडवणाऱ्या हातात पेन्सिल
धोत्रे हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे. वडार समाजात जन्मलेल्या शशिकांत यांच्या वडिलांचे अख्खे आयुष्य दगड फोडण्यात गेले. या दगडात वावरताना वयाच्या सातव्या वर्षी शशिकांत यांनी पेन्सिलीने चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. सुरेख चित्रे रेखाटण्याची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली आहे. जागर या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील
संस्कृती पेन्सिल चित्रातून रेखाटणार आहे. या चित्रांचे प्रदर्शन २०१९ साली युरोपमध्ये
होणार आहे.