चारे येथील जगदाळे भावकी पाळणार तीनच दिवसांचा दुखवटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:22 AM2021-09-13T04:22:19+5:302021-09-13T04:22:19+5:30
बार्शी : काळ बदलता तसे चालीरीती, रूढी परंपरादेखील बदलत आहेत. असाच एक क्रांतिकारी निर्णय कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे ...
बार्शी : काळ बदलता तसे चालीरीती, रूढी परंपरादेखील बदलत आहेत. असाच एक क्रांतिकारी निर्णय कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांची जन्मभूमी असलेल्या चारे (ता. बार्शी) येथील जगदाळे (भावकीने) कुटुंबीयाने घेत आधुनिकतेची कास धरली. त्यानी दुखवट्याबाबत एक पाऊल पुढे टाकून फक्त तीनच दिवसांचे सूतक पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी दिली.
चारे हे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. गावात तब्बल ७५ टक्के लोक हे जगदाळे आडनावाचे. गावातील स्व. सुशीला बळिराम जगदाळे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी जगदाळे कुटुंबीयांनी तीनच दिवसांचा दुखवटा पाळावा असा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावास जगदाळे कुटुंबातील सदस्यांनी संमती दिली.
यावेळी युवराज जगदाळे, रवी जगदाळे, प्रदीप जगदाळे, नंदकुमार जगदाळे, राहुल जगदाळे, महेश जगदाळे, जनक जगदाळे, जयराम जगदाळे, प्रशांत जगदाळे, हरीशचंद्र जगदाळे, संतोष जगदाळे, आदींनी प्रामुख्याने ठरावास संमती दिली.
अग्निदहन व तिसऱ्या दिवसाचा सावडणे हा कार्यक्रम पूर्वापार ठरल्याप्रमाणे करणे, पूर्वापार चालत आलेला दहाव्या दिवशीचा दशक्रिया विधी, दुखावट्यामधील शेवटचा-तेरावा दिवसाचा विधी, रक्षा विसर्जन, दशक्रिया विधीचे ठिकाण, हे त्या-त्या कुटुंबीयांच्या सोयीने व इच्छेनुसार करावे असे एकमताने ठरविण्यात आले.