नवरात्र उत्सवात होतोय जगदंबेचा जागर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:09 PM2018-10-13T13:09:51+5:302018-10-13T13:12:31+5:30
संपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जाते. तो हा आजचा दिवस.
भारतीय सणांच्या मुळाशी एक विचार असतो. विशिष्ट ऋतुमानाच्या परिवर्तनासोबत अव्यक्त, अनाकलनीय शक्तीची, ऊर्जेची पूजा बांधण्याची, तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची भक्ती भावना असते. जिच्यामुळे जीवमात्रांचे अस्तित्व आहे. त्यांचं भरण-पोषणही तीच करते. य:कश्चित जीवानं त्या विराटाची पूजा बांधत असताना तिचं प्रतीक म्हणून ओंजळभर माती आणून देव्हाºयावर सुक्या पानाच्या पात्रात विविध धान्यं पेरून थोडंसं पाणी शिंपून, त्यात ओल रहावी म्हणून मधोमध मातीचा छोटासा ‘घट स्थापून’ त्यात पाणी भरून संपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जाते. तो हा आजचा दिवस.
भारत हा कृषिप्रधान देश. कृषक हा धरणीमातेला, शेतीला, जमिनीला माता म्हणतो. ‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीपस्ति.’ देवत्व-दिव्यत्व हे मातृरूपात पाहिलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर वैष्णोदेवीपर्यंत उभ्या-आडव्या विशाल भारतात वेगवेगळ्या रूपानं शक्ती स्वरूपिणी मातेची वेगवेगळ्या नावाने, रूपाने भारतीयाने पूजा केली आहे.
आदिशंकराचार्याने अव्यक्त रूपास माता पार्वती, अन्नपूर्णा म्हणून संबोधलं. रामकृष्ण परमहंसांनी कालीच्या रूपात आराधना केली. शारदीय नवरात्र महोत्सवाचे आता उत्सवी रूप दिवसेंदिवस अधिक प्रदर्शनीय होत चाललं आहे. बंगालमध्ये हा नवरात्रोत्सव अत्यंत दर्शनीय असतो, तो पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येतात. गुजरातमध्ये गरबा नृत्य अत्यंत प्रसिद्ध आहे. कर्नाटकात चामुंडेश्वरीचा नवरात्रोत्सव.
म्हैसूर राजाचा दसरा दरबार त्या काळापासून लोकशाहीतल्या वर्तमान काळीही ते वैभव पाहायला लोक आजही जातात.
महाराष्टÑात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरगड तसेच अंबाजोगाई, सप्तशृंगीची मातेची रूपं चैतन्यदायी अशी आहेत. आश्विन मासातील नवरात्रीत सर्व शक्तीपीठात आईचा जागर मांडला जातो. अत्यंत कडक उपवास केले जातात. अनवाणी भक्त आपल्या राहत्या गावापासून आईच्या मंदिरापर्यंत पायी चालत जातात. तुळजापुरात मी काही वर्षे नोकरीनिमित्त होतो. कोजागरीच्या दिवशी मी पाहिलं की आख्खं गाव हे जागं होतं.
आईच्या नावानं गायिली जाणारी भक्तीगीतं, जळणारे पोत, वाद्यांचा, तुणतुण्यांचा टणत्कार, भोप्यांचे कुंकवाने भरलेले कपाळ, रस्त्याने भक्तिभावाने बसलेल्या भक्तांच्या भरलेल्या पिठानं परड्या, आकाशातला कोजागरीचा चंद्र जितका सुंदर तितक्याच पोताच्या प्रकाशात भरलेल्या पिठानं दिसणाºया परड्यादेखील भक्तिभावानं अधिक आकर्षक दिसत असत. ही माता भगवती नित्य शाश्वत आहे. तीच चराचरात भरुन उरली आहे. मानव तसेच देवतांच्या सहायार्थ ती वेळोवेळी अनेक रुपात प्रकट होते. नित्य असून ही ती प्रकट झाली असे म्हणण्याचा प्रघात आहे. दुर्गासपृशतीत म्हटले आहे-
नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततम्।।
तथापि तलामुत्पत्तिर्बहुधा श्रूयतां मम।
देवानां कार्य सिद्धयमाविर्भवति सा यदा।।
उत्पन्नेति तदा लोके सा नित्याभिधीयते।
(दुर्गा सपृशती-१/६४-६६)
चला आज अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत या शक्ती स्वामिणी, तुमच्या माझ्या सर्वचराचर असण्याला कारण असणाºया जगत्मातेचा जागर मांडू या. तिच्या विषयी कृतज्ञता नम्र भावे मांडू या.
-डॉ. इरेश स्वामी
(लेखक माजी कुलगुरू आहेत)