सोलापुरात जय श्रीरामचा नारा; हिंदू गर्जना मोर्चात हजारो तरूणांचा सहभाग
By Appasaheb.patil | Published: February 26, 2023 05:36 PM2023-02-26T17:36:12+5:302023-02-26T17:37:18+5:30
मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी मोठा सहभाग नोंदविला आहे.
सोलापूर : सकल हिंदू समाजातर्फे लव्ह जिहाद विरोधी, धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा, गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर दिन म्हणून शासनाकडून घोषित व्हावा या प्रमुख चार मागण्यांकरिता विराट हिंदू गर्जना मोर्चा रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापुरात निघाला. या मोर्चात सहभागी झालेले हजारो तरूणांनी भगवे झेंडे फडकावित जय श्रीरामचा नारा दिला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी मोठा सहभाग नोंदविला आहे.
या मोर्चाला छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ झाला. बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, श्री सोन्या मारुती, श्री दत्त मंदिर, सावरकर मैदान, सुभाष चौक, सरस्वती चौकमार्गे हिंदू गर्जना मोर्चा चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित होत आहे. या मोर्चाच्या समारोपाला प्रखर हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
याबाबत गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. गोहत्या बंदीचा कायदा लागू आहे. मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे दररोज हजारो गाई कापल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांवर कठोर उपाय योजना कायद्याद्वारे करावी आणि धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या हा दिवस 'धर्मवीर दिन' म्हणून सरकारने घोषित करावा अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.