जयसिंगपूरच्या तरुणीची पंढरपुरात आत्महत्या, तिसऱ्या मजल्यावरुन टाकली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:28 AM2022-01-31T11:28:27+5:302022-01-31T11:28:52+5:30
सदर तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिने इमारतीवरून उडी मारली असल्याची शक्यता.
पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या जयसिंगपूर येथील एका महिलेने पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. शैलजा शहापुरे (वय-३५) असे मृत तरुणीचे नाव आहे. रविवारी (दि.३०) दुपारी ही धक्कादायक घटना घडली.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात सदर तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिने इमारतीवरून उडी मारली असल्याची शक्यता वर्तवली आहे. मृत शैलजा शहापुरे हिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला असता मागील काही वर्षांपासून ती मानसिक आजारी असल्याची माहिती दिली. तिच्यावर सांगली येथील मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारदेखील सुरू होते.
विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ती पंढरीत आली होती. यावेळी तिने नगरपालिका शॉपिंग सेंटरमधील एका सोनाराच्या दुकानात येऊन सोने मोडायचे असल्याबाबत केवळ चौकशी केली. यानंतर पालिकेच्या इमारतीचे शटर उघडे असल्याने तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. येथील कठड्यावरून तिने थेट खाली उडी मारली. पालिकेच्या तळमजल्यावर वाहनतळ असून येथे जोरदार आवाज झाल्याने दुकानदारांनी पाहिले. परंतु सदर महिला गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी मयत शैलजा शहापुरे यांच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले.