जलाभिषेकाने शंभू महादेवाच्या यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:43+5:302021-04-26T04:19:43+5:30
माळशिरस : शिखर शिंगणापूरची यंदाची चैत्री यात्रा मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. पूजा-अर्चा व मानाच्या परंपरा जपत प्रशासनाच्या आदेशानुसार ...
माळशिरस : शिखर शिंगणापूरची यंदाची चैत्री यात्रा मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. पूजा-अर्चा व मानाच्या परंपरा जपत प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रेतील सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थान समिती, सेवाधारी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले. चैत्र शुद्ध द्वादशीला सासवड येथील मानाच्या कावडीधारकांनी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी शिवभक्तांना प्रशासनाचे नियम पाळून यात्रा पार पाडावी लागली. पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच यात्रा काळात जमावबंदी आदेश लागू केला होता. मात्र, यात्रेची परंपरा अबाधित राहण्यासाठी सासवड पंचक्रोशीतील खळदकर महाराज तसेच भुतोजीबुवा तेली या दोन कावडीधारकांना जलाभिषेक करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती.
त्यानुसार सासवड येथील कैलास काशीनाथ कावडे तसेच खळदकर महाराजांनी नीरा आणि कऱ्हा नद्यांचे पवित्र जल कलशामध्ये आणून शंभू महादेवाला जलाभिषेक केला. यानंतर शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सांगता करण्यात आली.
मुंगी घाट ओस
शिखर शिंगणापूर यात्रेतील प्रमुख श्रद्धा व भक्तीचा संगम, मुंगी घाटातील कावडींचा थरार, घाटाच्या पायथ्यापासून मुंगीप्रमाणे चढणारे भाविक अवघड कड्यावरून ‘हर हर महादेव’चा जयघोष करत जोशपूर्ण वातावरणात कावडी महादेवाच्या भेटीला घेऊन जाण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे ना कावडींचा थरार, ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण, ना फटाक्यांची आतषबाजी, ना हर हर महादेवचा जयघोष, ना शिवभक्तांचा जल्लोष... अशा सुन्न वातावरणात गर्दी गोंगाटाशिवाय मुंगी घाट व शिंगणापूर नगरी ओस पडलेली दिसत होती.
फोटो ::::::::::::::::::
शिखर शिंगणापूर येथील यात्रेची खळतकर महाराजांच्या उपस्थितीत जलाभिषेक करून सांगता करण्यात आली.