।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. .. आनंदे केशवा भेटताचि।।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 08:41 PM2022-07-09T20:41:24+5:302022-07-09T20:41:32+5:30
pandhrpur Ashadhi Wari
आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा सण आहे. या उत्सवाची त्याला आस लागलेली असते. गेली दोन वर्षे या आनंदापासून तो दुरावला होता. यावर्षी परमपिता श्री विठ्ठल कृपेनेच वारकरी, भाविक लाखोंच्या संख्येने भुवैकुंठ पंढरीत येत आहेत. या सुखाचे वर्णन करताना संत सेना महाराज आपल्या अभंगात म्हणतात, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताचि. या सुखाची उपमा नाही त्रिभुवणी, पाहिली शोधोनि अवघी तीर्थे. ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे. सेना म्हणे खुण सांगितली संती, यापरती विश्रांती न मिळे जीवा.
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां, हा सुखसोहळा स्वर्गी नाही. कृष्ण-विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्राजंळ वैकुंठीचा असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. सकळाशी येथे अधिकार आहे एवढंच नव्हे तर कलियुगात स्वतःच्या उद्धारासाठी, चारी मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी श्री विठ्ठल नाम तारक आहे. आपल्या आवडीचे सुख मिळावे म्हणून हा श्री विठ्ठल वैकुंठ सोडून पंढरीत आला व भक्त पुंडलिकाच्या निमित्ताने अठ्ठावीस युगापासून सर्वांना दर्शन देण्यासाठी तो कर कटेवर ठेवून उभा आहे.
संत कान्होपात्रा आपला भाव व्यक्त करताना सांगतात माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमातिरी. येथे आहे माय बाप, हरे ताप दरुशनें. निवारली तळमळ चिंता, गेली व्यथा अंतरीची. कैशी विटेवरी शोभली, पाहुनि कान्होपात्रा धाली. संत ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या भेटीचे, सुख सांगतात. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताचि जोडी म्हणुनि विठ्ठल आवडी. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवरू. भाविकांना आषाढी एकादशी हा सोनियाचा दिन असतो. अवघा व्यापक मुरारी असणारा हरी बाह्य अंतरी पाहिल्याचा आनंद भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर जाणवतो. पुढील वर्षभरासाठी आनंदाची ही पुंजी तो अंतकरणात साठवत असतो. संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काहींची या संत वचनांवर वारकऱ्यांची श्रद्धा आहे. संत माणकोजी बोधले महाराज आपल्या भक्तांना, प्रापंचिक जीवाला सहज, सोपा उपदेश करतात. पंढरीची वाट, पापे पळती हातोहात. पुढे पंढरीरायाला प्रार्थना करतात. तूच आमचे वीत्त, तूच आमचे गोत. बोधला म्हणे अणू नेणे काही, प्रीती तुझे पायी बैसो माझी. संत नामदेव महाराज पांडुरंगाच्या दर्शनाचे महत्त्व विशद करतात. तयाच्या दर्शने लाभ कोटी गुणे झाला. भवसिंधू आटला हेळामात्रें ऐसे पेठ निर्मिली देवें ही पंढरी, पुंडलिक द्वारी उभा असे. श्री विठ्ठल दीनांचा दयाळू आहे. त्याला दासांची कळकळ आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत असे त्याचे भक्तासाठी सामर्थ्य आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणशी पात्रापात्रात ही त्याची समानता आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणताहे हा वरदवंत आशीर्वाद भक्तांना कठीण प्रसंगात आशाळभूत ठेवतो. म्हणूनच संत जनाबाई म्हणतात नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार. नाम दळणी कांडणी, म्हणे नामयाची जनी. संंत एकनाथांनी आपल्या अभंगात स्वानंदाचा गाभा, श्री विठ्ठल मुखाची शोभा असं देखणेपणाचे हुबेहूब वर्णन केले आहे.
संत तुकाराम महाराज वारंवार पंढरीचा महिमा गातात. ऐसा ठाव नाही कोठे, देव उभाउभी भेटे. तुका म्हणे पेठ, भूमिवरी हे वैकुंठ. विठ्ठल हा वारकऱ्यांचा, भाविकांचा तमाम देशवासीयांचा जीव आहे. भाव आहे. कुळधर्म आहे. कुळाचार आहे. माता-पिता, बहीण, बंधू, सखा, सर्वस्व आहे. या साधन सुचितेसाठीच आषाढी वारी कधी चुकू नये ही मागणी तो विठ्ठलाकडे आवर्जून करत असतो.
वारीहून परतताना कन्या सासुराशी जाये, मागे परतोनि पाहे. चुकलिया माये, बाळ हुरुहुरु पाहे. वारकऱ्यांच्या मनातील हा भाव संत तुकोबांराया व्यक्त करतात. जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. तरीही वारकरी अमृताहुनीही गोड अशा श्री विठ्ठल नामाचा जयघोष करत आषाढी वारी पूर्ण करतात. श्री विठ्ठल चरणी साष्टांग दंडवत. राम कृष्ण हरी. जय बोधराज.
-ह.भ.प. डॉ. रंगनाथ काकडे, विद्यानगर, वैराग