जवळगाव धरण ओव्हरफ्लो.. तीस गावांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:53+5:302021-09-26T04:24:53+5:30
वैराग : जवळगाव (ता.बार्शी) येथील नागझरी नदीवरील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार ...
वैराग : जवळगाव (ता.बार्शी) येथील नागझरी नदीवरील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सुमारे तीस गावांना याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. शिवाय १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता १२३३ .१० द. ल. घ. मी.आहे. कालव्याच्या खाली सुमारे सहा हजार हेक्टर तर उचल पाण्यातून सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
जवळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे कालव्याद्वारे हत्तीज, हिंगणी, खुंटेवाडी, राळेरास, दहिटणे, सासुरे, कौठाळी, शेळगाव, देगाव, वाळूज, या गावांना लाभ होतो तर प्रकल्पातून पाण्याच्या उपशाद्वारे अंबाबाईची वाडी, जोतिबाची वाडी, आंबेगाव, भालगाव, रुई, मिर्जनपूर, कासारी, भांडेगा, सारोळे, चिंचखोपण, खुटेवाडी या बार्शी, तुळजापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आदी चार तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे.
या पाणलोट परिसरातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी, ऊस, द्राक्ष, सीताफळ यासारख्या बहुवार्षिक पिकाबरोबर सोयाबीन, कांदा, तूर, मूग, उडीद, ज्वारी ही देखील पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, धरणाच्या वरील भागात छोटे छोटे प्रकल्प पहिल्यांदाच
सलग दोन वर्षे भरलेले नागरिकांना पाहावयास मिळाले असल्याचे नितीन कापसे यांनी सांगितले.
-----