सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित
By appasaheb.patil | Published: May 23, 2019 07:53 PM2019-05-23T19:53:25+5:302019-05-23T19:59:31+5:30
सोलापूरसह माढ्यात भाजप-शिवसेनेचा जल्लोष; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव
सोलापूर : संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी व माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय निश्चितच मानला जात आहे़ रात्री आठपर्यंत आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून महास्वामी हे १ लाख ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत तर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे १ लाख १० हजार मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकाºयांकडून देण्यात आली.
सोलापूर व माढा लोकसभेसाठी गुरूवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला़ दिवसभर जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले व अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली विधानसभानिहाय मतदारसंघाची मतमोजणी होत आहे़ सायंकाळी आठवाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील २२ तर माढा लोकसभा मतदारसंघातील २२ फेºयांची मतमोजणी पूर्ण झाली होती़ रात्री आठवाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी याना ५ लाख ५ हजार १३२, काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे याना ३ लाख ५४ हजार ९९४, वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ प्रकाश आंबेडकर याना १ लाख ६३ हजार ८७० मते मिळाली आहेत़ यात भाजपचे महास्वामी यानी १ लाख ५० हजार १३८ मतांची आघाडी घेतली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर याना ५ लाख ८२ हजार ७०५, राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना ४ लाख ९७ हजार ७७८ मते मिळाली आहेत़ याठिकाणी असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड़ विजय मोरे यांनाही मोठया प्रमाणात मते मिळाली आहेत.