जयसिद्धेश्वरांनी काँग्रेस नेत्यांची नावे सांगावीत, राजकारण सोडतो : विश्वनाथ चाकोते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:17 PM2019-03-16T14:17:11+5:302019-03-16T14:19:34+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघ : आम्हाला कोण कुठं याच्याशी देणं-घेणं नाही
सोलापूर : डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी मदत करणाºया काँग्रेसच्या एका नेत्याचे नाव सांगावे, मी राजकारण सोडून देतो, असे उघड आव्हान माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी दिले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी काँग्रेसमधील काही नेते मला मदत करणार, असे सांगितल्याचे समजले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहर उत्तरमधील कार्यकर्त्यांची काँग्रेस भवनमध्ये बैठक झाली.
या बैठकीत सुनील रसाळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना माजी आमदार चाकोते यांनी स्पष्टीकरण दिले होते. काँग्रेसमध्ये चाकोते परिवार, अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राजशेखर शिवदारे, हब्बू ही मंडळी प्रामाणिकपणे काम करीत आहेत.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथे त्यांनी कारखान्यासाठी धर्मराज काडादी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे. अशी परिस्थिती असताना महाराजांनी असे वक्तव्य करून संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी काँग्रेसमधील एका तरी नेत्याचे नाव सांगावे.
आम्हाला महाराज कुठं आहेत, त्यांच्याबरोबर कोण आहे याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांनी काँग्रेसचे नेते मदत करणार आहेत, असे वक्तव्य केल्याने याचा खुलासा झाला पाहिजे. त्यांनी उगीच काँग्रेसला डिवचले म्हणून आमचे हे उत्तर आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांच्यासोबत होटगी महाराज होते का?. विद्यापीठ नामांतरामुळे सिद्धेश्वर भक्त नाराज झाले आहेत. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी महाराजांना पुढे करण्याचा भाजप मंडळींचा प्रयत्न आहे, असे विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले.
महाराजांचा धसका का ?
- डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या उमेदवारीबाबत सध्या फक्त चर्चा सुरू आहे. पण काँग्रेसवाल्यांनी त्यांचा इतका धसका का घेतला कळत नाही. भाजप व विकासकामाबाबत न बोलता सर्व जण महाराजांवर तुटून पडले आहेत. महाराजांच्या बाबतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विनाकारण अप्प्रचार करण्यात येत आहे. भाजपच्या कामाविरुद्ध बोलण्याचा त्यांच्याकडे मुद्दाच दिसत नाही, अशी प्रतिक्रिया सभागृहनेते संजय कोळी यांनी व्यक्त केली.