खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केले ९०० पानी म्हणणे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:48 PM2020-02-01T12:48:40+5:302020-02-01T12:53:34+5:30
जात प्रमाणपत्र पडताळणी वाद; तक्रारदारांनी विचारले मुळ दाखला कुठे आहे ?
सोलापूर : खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी याचे वकील अॅड. संतोष न्हावकर यांनी जात प्रमाणपत्राच्या पुरावे स्पष्ट करण्यासाठी ९०० पानी म्हणणे आज जात प्रमाणपत्र पडताळणीसमोर सादर केले आहे. त्यावर युक्तीवाद करण्यासाठी १५ दिवसाची मुदत मागितली आहे.
खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी याच्या बेडा जंगम याच्या जात प्रमाणपत्रावर केलेल्या तक्रारीवर शनिवारी अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ याच्यासमोर सुनावनी झाली़ यावेळी शिवाचार्य याचे वकील संतोष न्हावकर यांनी यापुर्वी सादर केलेले चार दाखल्याच्या स्पष्टीकरणासाठी ९०० पानी म्हणणे सादर केले. त्यावर तक्रारदार विनायक कंदकुरे याचे प्रतिनिधी भारत कंदकुरे यांनी शिवाचार्य याचा मुळ दाखला कुठे आहे असा सवाल उपस्थित केला़ त्यावर न्हावकर यांनी तो उच्च न्यायालयाकडे सादर केल्याचे सांगितले़ ९०० पानी म्हणणे वाचून उत्तर देण्यासाठी कंदकुरे यांनी १५ दिवसाची मुदत मागितली आहे़ त्यावर अद्याप सुनावनी प्रलंबित आहे.