चार मृत उंटांना पुरण्यासाठी ‘जेसीबी’ने खोदले वीस फुटांचे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:00 PM2019-09-24T13:00:54+5:302019-09-24T13:03:42+5:30
राजस्थानहून हैदराबादकडे जाणाºया मालट्रकमध्ये गुदमरून मरण पावलेल्या उंटावर सोलापुरात अंत्यसंस्कार
सोलापूर : राजस्थानहून हैदराबादकडे जाणाºया मालट्रकमध्ये गुदमरून मरण पावलेल्या चार उंटांचे शवविच्छेदन करून, तुळजापूर नाका येथील कचरा डेपो जवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. जिवंत असलेल्या दहा उंटांचे गोशाळेत पालन पोषण केले जात आहे.
शनिवारी सायंकाळी हैदराबाद रोडवरील एका हॉटेलसमोर संशयित मालट्रकला थांबवण्यात आले होते. गोसेवकांनी मालट्रकची पाहणी केली असता, त्यात १४ उंट निर्दयीपणे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. मालट्रक शेळगी येथील पोलीस चौकीजवळ नेऊन चौकशी केली असता, सर्व उंट राजस्थानवरून कत्तल करण्यासाठी हैदराबाद येथे घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले.
पकडण्यात आलेले १४ उंट मरिआई चौकातील अंतरिक्ष गो शाळेत नेण्यात आले. उंट मालट्रकमधून बाहेर काढल्यानंतर त्यातील चार उंटांचा मृत्यू झाला. गोसेवकांनी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना बोलावून घेतले. पोलीस पंचनामा करून चार उंटांचे शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदनानंतर मेलेल्या उंटांना कचरा डेपोजवळ नेण्यात आले. कचरा डेपोच्या पाठीमागे असलेल्या महानगरपालिकेच्या जागेत २० फूट खोल व २० फूट लांबीचा खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यात एका बाजूला एक अशा चार उंटांना पुरून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खाद्याची माहिती घेतली जात आहे...
- मालट्रकमधील पकडण्यात आलेल्या १0 उंटांच्या खाद्याची माहिती घेतली जात आहे. सध्या या उंटांना कडुलिंबाचा पाला व पाणी दिले जात आहे. विजापूर वेस येथे उंट पालक असून त्यांच्याशी संपर्क साधून खाद्याची माहिती घेतली जाणार आहे. उंटाला लागणारे खाद्य घेऊन ते देण्याचे नियोजन सध्या अखिल भारतीय कृषी गोसेवक करीत आहेत.
उंटांना गोशाळेतून महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्याबाबत विचार केला जात आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना भेटून चर्चा केली जाणार आहे. प्राणिसंग्रहालयात उंटांचा समावेश झाल्यास त्यांची सोय होईल.
-सुधीर बहिरवाडे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ,