जिल्हा परिषदेच्या समोरील खोक्यांवर फिरला महापालिकेचा जेसीबी!
By राकेश कदम | Published: March 14, 2024 07:33 PM2024-03-14T19:33:22+5:302024-03-14T19:33:51+5:30
शुक्रवारी पुन्हा ही कारवाई सुरू राहील असे अतिक्रमण हटाव विभागाकडून सांगण्यात आले
राकेश कदम, सोलापूर: महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोरील दहा खोक्यांवर कारवाई केली. शुक्रवारी पुन्हा ही कारवाई सुरू राहील असे अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोरील खोक्यांमुळे एक रहदारीला अडथळा होतो. ही खोकी त्वरित हटवण्यात यावीत असे पत्र जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले होते. या पत्रानुसार कारवाई झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कारवाई थांबवण्यात यावी यासाठी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचे फोन आले होते. परंतु तोपर्यंत कारवाई संपली होती. आजूबाजूची आणखी खोकी हटवण्यात यावीत, असे गुरुवारी सायंकाळी बजावले आहे. दुकानदारांनी स्वतःहून खोकी न हटवल्यास महापालिकेला कारवाई करावीच लागेल असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महापालिकेच्या या कारवाईचा निषेध केला. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. महापालिका जाणून बुजून हातावर पोट असलेल्या लोकांवर कारवाई करत आहे. या कारवाईची ही वेळ नव्हती असेही नरोटे म्हणाले.