जीपमध्ये जर्शी गाई कोंबून निघाले; कुर्डूवाडीत पोलिसांनी अडवून पकडलं
By काशिनाथ वाघमारे | Published: May 23, 2023 07:25 PM2023-05-23T19:25:46+5:302023-05-23T19:26:07+5:30
प्राणीमित्रांनी जनावरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय व्यक्त केला.
सोलापूर : काही जर्शी गायी जीपमध्ये तोंड बांधून घेऊन निघाल्याचा कॉल पोलिस ठाण्याला येताच कुर्डूवाडीत (ता. माढा) टेंभुर्णी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ संबंधीत वाहन पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 'टोल फ्री ११२' वर एका प्राणीमित्राचा कॉल आला त्यावरुन ही कारवाई झाली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल जयशंकर रायबा नलावडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी नलावडे हे कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात लऊळ बीटला मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी १०.५६ वाजता डायल ११२ वर एका प्राणीमित्राचा कॉल आला. त्याने जनावरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे व फिर्यादी नलावडे यांनी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या सूचनेनंतर कुर्डूवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर संकेत मंगल कार्याजवळ आले. टेंभुर्णी येथून पांढ-या रंगाची जीप आली. या जीपमध्ये काळ्या,पांढ-या जर्शी गाई कोंबलेल्या दिसून आल्या. यावेळी जीपमधील शकील वहाब कुरेशी (वय ३१ वर्षे ) व बशीर शकूर कुरेशी (वय २९़, दोघे रा. पापनस, ता. माढा) या दाेघांकडे चौकशी केली असता आम्ही व्यापारासाठी जनावरे घेऊन निघालो असल्याचे म्हणाले. या गाई रामा वाघमोडे (रा. अकलूज, ता. माळशिरस) यांच्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची बैल, म्हैस, रेडा यांच्यासाठी असलेली पावती देखील दाखवली. परंतु त्यांनी जीपमध्ये क्रूरतेने गाई कोंबून भरलेल्या आढळल्या.