सांगोला सराफ चोरी प्रकरणी झारखंडची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ७.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:47 AM2017-11-25T11:47:24+5:302017-11-25T11:47:52+5:30
सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मागील आठवड्यात या प्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन यात सहभागी असलेल्या अन्य दोघांना झारखंड येथून ताब्यात घेऊन २४ नोव्हेंबर रोजी अटक केली. या टोळीतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
ओंकार ज्वेलरी शॉप दुकान चोरी प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेऊन खिदीर चौधरी शेख (वय ३४,रा.मानसिंगा पोस्ट झारखंड), आयाज शफी मन्सुरी (वय ३०,रा. सिरीन अपार्टमेंट, जि. ठाणे) या दोघांना ताब्यात घेऊन १ किलो चांदी व एक कार असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सांगोला पोलीस ठाण्याचे मिळून एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने झारखंड येथे जाऊन आरोपी आलमगीर जब्बार शेख (वय ३२,रा.झारखंड), चांदी विकत घेणारा सतनकुमार रामदेव साह (रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी सतन याच्याकडून पोलिसांनी ३ लाख रुपयांची चांदी जप्त केली. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विभुते, शहाजी सावंत, पोलीस हवालदार लतीफ मुजावर, पोलीस नाईक संतोष चव्हाण, पोकॉ शिवाजी काळे,पोलीस हवालदार गोरक्षनाथ गांगुर्डे, सागर शिंदे आदीनी ही कामगिरी केली
------------------
अशी केली होती चोरी
झारखंडच्या टोळीने आेंकार ज्वेलरी दुकानाच्या मागील भिंतीस भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तिजोरी गॅस कटरने कट करुन १६ किलो चांदीने दागिने घेऊन पसार झाले होते.