सोलापूरातील वन स्टॉप सेंटरसाठी जिजामाता हॉस्पिटलची जागा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:57 AM2018-04-19T11:57:46+5:302018-04-19T11:57:46+5:30
आढावा बैठकीत झाला निर्णय, अहवाल पाठविण्याचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आदेश
सोलापूर : महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणाºया वन स्टॉप सेंटरसाठी शहरातील जिजामाता हॉस्पिटलमधील जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दर्शविली आहे. या जागेची पाहणी करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या.
अत्याचारग्रस्त पीडित महिलांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशभरात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नुकतीच केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्याच्या कामाला गती मिळाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव गणेश मंझा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय खोमाणे, माजी नगरसेवक प्रवीण डोंगरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार मोहिते-पाटील म्हणाले, पीडित महिलांना वैद्यकीय, समुपदेशन, कायदेविषयक यांसारख्या अन्य सुविधा एकाच छताखाली तात्काळ मिळाव्यात, यासाठी वन स्टॉप सेंटर महत्त्वाचे आहे. या सेंटरसाठी केंद्र शासनाकडून आवश्यक बाबींसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटल येथील जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त ढाकणे यांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शवली. महिला व बालविकास अधिकारी यांनी त्या जागेची पाहणी करून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जागा उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव केंद्रीय महिला व बालविकास विभागाकडे सादर करावा, अशा सूचना मोहिते-पाटील यांनी केल्या.