जितेंद्र साठेंना बाजार समिती सभापती करा; शरद पवारांचा सुशीलकुमार शिंदे अन दिलीप मानेंना फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:36 PM2019-06-07T15:36:50+5:302019-06-07T15:41:02+5:30
सोलापूर बाजार समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
सोलापूर: बाजार समितीच्या सभापतीपदासाठी सर्वच नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पालकमंत्री विजयकुमार देशमुख हेही मैदानात उतरले आहेत. मंत्रीपदावर राहून सभापती होता येते का?, याची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. संख्याबळ नसताना अप्पू पाटीलही चेअरमन होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बाळसाहेब शेळके यांना अगोदरच सभापती करायचे ठरले आहे असे सांगितले जात असताना जितेंद्र साठेही शर्यतीत उतरले आहेत. यामुळे सोलापूर बाजार समितीचे सभापती होणार कोण?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार दिलीप माने यांनी १३ मे रोजी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. त्यानंतर नवीन निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जगताप यांनी सोमवार दिनांक १० जून रोजी सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली आहे. निवड चार दिवसावर आली असताना इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री व पालकमंत्री असलेले विजयकुमार देशमुख यांना सभापती होता येते का?, याची चौकशी स्वीय सहायकाने केली आहे. पणन अधिनियमाची कसलीही अडचण नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्रीही इच्छुक असल्याचे दिसत आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाचे दोनच संचालक आहेत. रामप्पा चिवडशेट्टी व अप्पू पाटील. दोन संचालक असताना अप्पू पाटील फोडाफोडीचे राजकारण करून सभापती होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दिलीप माने यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सभापतीपदी कोण तर अगोदरच बाळासाहेब शेळके यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. सभापती निवडीसाठी आतापर्यंत संचालकांची बैठक घेऊन नावाची चर्चा केली नसल्याचे सांगण्यात आले. शेळकेंचे नाव चर्चेत असताना उत्तर सोलापूर तालुक्याला संधी मिळावी यासाठी जितेंद्र साठे प्रयत्नशील आहेत. याशिवाय दिलीप मानेही पुन्हा सभापती होतील असे सांगितले जात आहे. सध्याच्या या राजकीय परिस्थितीमुळे सोलापूर बाजार समितीचे सभापती होणार कोण?, याकडे लक्ष लागले आहे.
शरद पवारांचा साठेंसाठी फोन
- झेडपीचे विरोधी पक्ष नेते बळराम साठे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांना बाजार समितीतील बलाबल समजावून सांगितले. त्यानंतर पवार यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांना फोन करून जितेंद्र साठे यांना सभापती करण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.