सोलापुरात "जीवेत शरद: शतम" योजना लाभदायक ठरणार; सहा लाख ज्येष्ठ पात्र होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 01:24 PM2021-02-19T13:24:13+5:302021-02-19T13:24:13+5:30
शासनाची नवी योजना : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळेल मंजुरी
सोलापूर : साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी आता सामाजिक न्याय विभाग घेणार आहे. चांगले आरोग्य लाभावे आणि ज्येष्ठ नागरिक शताब्दी वर्ष साजरे करावेत यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी नवीन योजना प्रस्तावित आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. या योजनेसाठी सोलापुरातील जवळपास सहा लाख ज्येष्ठ नागरिक पात्र ठरतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे वय ८१ वर्षे पूर्ण झाले. त्यांच्या नावाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे ''जीवेत शरद: शतम'' ही नवीन योजना आणताहेत. या योजनेअंतर्गत साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईल. तसेच त्यांच्यावर मोफत उपचार देखील होतील. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कौटुंबिक पातळीवर देखील त्यांची आरोग्याच्यादृष्टीने अवहेलना होत असते. ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशातून नवीन योजना प्रस्तावित आहे. लवकरच विधिमंडळात योजनेला मान्यता मिळेल. त्यामुळे राज्यभरातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय सेवेला समर्पित केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी
सोलापूर निवडणूक विभागाने जानेवारीत विविध वयोगटांतील मतदारांची यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार ६० ते ६९ वयोगटातील मतदारांची संख्या तीन लाख ७० हजार इतकी आहे, तर ७० ते ७९ वयोगटातील मतदारांची संख्या दोन लाख २२ हजार इतकी आहे. यासोबत शंभर वय ओलांडलेल्या मतदारांची संख्या जवळपास चार हजार आहे. साठीपुढील मतदारांची एकूण संख्या सहा लाखांवर आहे. या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल.