तरुणांना जॉबची चिंता; महिलांना कोरोनाची भीती तर विद्यार्थी मानसिक तणावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 12:34 PM2021-05-10T12:34:27+5:302021-05-10T12:34:37+5:30
विद्यार्थी मानसिक तणावात : जास्त ताण न घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
सोलापूर : कोरोनाच्या स्थितीमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आल्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले आहे. परिणामी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावात जात आहे. यामुळे मनोविकारतज्ज्ञांकडील अपॉइंटमेंटस् वाढलेल्या आहेत. यात तरुणांचे प्रमाण जास्त असून ते जॉबबद्दल चिंता करत आहेत, तर महिलांना कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची भीती सतावत आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.
कोरोनाचा सर्वच वर्गातील लोकांवर परिणाम झाला आहे; पण त्यातल्या त्यात मध्यमवर्गाला जास्त मानसिक ताण निर्माण झाला आहे. उच्च वर्गातील लोकांना कोरोनाची जरी भीती असली तरी रोजगाराबद्दल त्यांना चिंता नाही आणि गरीब समुदायाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून थोडीफार मदत मिळत असल्यामुळे त्यांचा ताण थोडा कमी आहे; पण मध्यम वर्गातील जे सुशिक्षित तरुण आहेत ते इतरांना मदत मागू शकत नाहीत. कारण त्यांना सध्या मानसिकदृष्ट्या चांगले वाटत नाही. यामुळे सध्या सर्वात जास्त ताण मध्यमवर्गातील कुटुंबावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
उच्च वर्गातील लोकांना ज्यांना कोरोना झालेला आहे, अशांना पुन्हा आपल्याला कोरोना होईल का? याची भीती वाटत आहे. यातूनच त्यांची झोप कमी होत आहे. तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी एक समान झाले आहेत. यातून त्यांना करिअरची चिंता लागली आहे. सोबत लहान मुले खेळण्यासाठी बाहेर जाण्यास घाबरत आहेत. यामुळे पालकांकडून दिलेला मोबाइल आणि टीव्ही हा त्यांचा भावविश्व झाला आहे तर महिलांमध्ये घरातील वृद्ध मंडळी गेलेल्या आहेत यामुळे मुलांचा सांभाळ कसा होईल. याची चिंता ते करत आहेत. यासाठी मनात कोरोनाची भीती न बाळगता सध्याचे वातावरण कुटुंबासोबत आनंदाने घालवावे व आपल्या अडचणीबाबत शांततेत विचार करावा व त्यातून मार्ग काढावा असे आवाहन डॉक्टर करत आहेत.
पुरुषांचे प्रश्न
- १) सर नोकरी गेलेली आहे. यामुळे उदरनिर्वाहाचे साधन थांबले आहे. कोरोना कधी संपेल.
- २) खूप कष्ट करून मी गाडी घेतली होती, पण नोकरी गेल्यामुळे गाडीचे हप्ते भरणे झाले नाही. यामुळे फायनान्सवाल्याने गाडी उचलली. मी काय करू?
- ३) मला कोरोना झाला होता पुन्हा होईल का याची मला भीती वाटत आहे.
पुरुष शक्यतो व्यक्त होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये दडपण निर्माण होत आहे. यामुळे त्यांचा कोंडमारा होत आहे. यातून तो व्यसनाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. सध्याचा या कालावधीत महिला ही तणावात आहेत पण योग्य ते समायोजन करत असल्यामुळे त्यांच्यात पुरुषांच्या तुलनेत तणाव कमी दिसत आहे. पण सध्याच्या परिस्थितीमुळे काहींना शेजारुन ॲम्ब्युलन्स जरी गेली तरी त्यांची झोप उडत आहे अशा तक्रारी मानसोपचार तज्ज्ञांकडे येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
कुटुंबाची चिंता
सर नोकरी गेली. आता मी काय करू. हे सर्व कधी संपेल असे प्रश्न तरुणांकडून विचारले जात आहेत. सगळं काही लवकर सुरळीत व्हावे व आपण कामावर जावे यासाठी तरुण सध्या लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. सोबतच आपण कामावर गेल्यानंतर आपल्यामुळे कुटुंबीयांना बाधा तर होणार नाही ना याचा विचारही तरुणांना सतावत आहे. यामुळे याबाबतचे प्रश्न तरुणांकडून विचारले जात आहेत, अशी माहिती डॉ. अतिश बोराडे यांनी दिली.
सध्या सर्वांवर तणाव जरी असला तरी तणावाचे समायोजन करणे गरजेचे आहे. सारखे तणावात असल्यामुळे तणाव दुसऱ्या मार्गाने म्हणजेच डोकेदुखी, पोटदुखी किंवा अन्य आजारातून बाहेर पडू शकतो. यामुळे सध्या सकारात्मक बाबींवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबाला वेळ द्या.
- दिलीप बुरटे, मनोविकार तज्ज्ञ