बोगस कागदपत्रं दाखवून मिळविली नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:30+5:302021-06-24T04:16:30+5:30
माढा तालुक्यातील लोणी-नाडी ग्रामपंचायतमधील सेवक (शिपाई) संतोष हरिभाऊ खंडागळे यांचे बनावट सेवा पुस्तक तयार केले असून त्याआधारे आरोग्य सेवकाची ...
माढा तालुक्यातील लोणी-नाडी ग्रामपंचायतमधील सेवक (शिपाई) संतोष हरिभाऊ खंडागळे यांचे बनावट सेवा पुस्तक तयार केले असून त्याआधारे आरोग्य सेवकाची नोकरी मिळविली आहे. ग्रामसेवकाने १५ सप्टेंबर २०२० रोजी मासिक सभा व त्यात बोगस ठराव दाखवून ग्रामपंचायत संबंधित शिपायाचे दोन दोन सेवा पुस्तके उपलब्ध केली आहेत. त्यातही खाडाखोड आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करीत सेवेतून निलंबित करावे, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
सध्या तो सेवक (शिपाई) पिंपळनेर आरोग्य केंद्रातील कुर्डू उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे. खंडागळे यांच्यावर ग्रामस्थांनी केलले काही गुन्हेदेखील पोलिसांत दाखल असल्याने त्याबाबत न्यायालयात केस सुरू आहे. याबाबतही त्यानी खोटी प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेला सादर केली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात केलेल्या कामाबाबत त्याच्याविरुद्ध पंचायत समिती व इतर ठिकाणी तक्रारी ग्रामस्थांच्या दाखल आहेत. तरीही तो जिल्हा परिषद सेवेत रुजू झाला आहे, त्याच्यावर कारवाई करावी असे ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
---
दोन सेवा पुस्तके
दोन्ही सेवा पुस्तकांतील नोंदी या वेगवेगळ्या असून त्यात खाडाखोडही केलेली आहे. शिपाई संतोष हरिभाऊ खंडागळे यांनी ग्रामसेवकाच्या मदतीने बनावट सेवा पुस्तक हवे तसे करून घेतले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १० टक्के कोट्यातून नोकरीही मिळविली आहे.
--------
संबंधित सदस्याच्या तक्रारीत काही तथ्य नाही. याबाबत पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांमार्फत सध्या चौकशी सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर सर्वांना याबाबत कळेल. मी कोणताही बोगस ठराव केला नाही.
प्रताप जाधव, ग्रामसेवक, लोणी-नाडी ग्रामपंचायत
----