न्यायाधीशांवर उगारली कु-हाड; सुरक्षेत हलगर्जीपणा, सोलापुरातील पाच पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:44 AM2017-12-24T01:44:03+5:302017-12-24T01:44:12+5:30
न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कु-हाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना शनिवारी निलंबित करण्यात आले.
सोलापूर : न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कु-हाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना शनिवारी निलंबित करण्यात आले.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मल्लिकार्जुन पालवे, शहर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार भीमाशंकर मारुती वाघे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वसंत चिंतामणी जैन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक बाबूराव गावित, जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस ज्ञानदेव खंडू कोळेकर अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
पोपट श्यामराव नलावडे (वय ६७, रा. हळदुगे, ता. बार्शी) हा माहिती अधिकाराखाली माहिती मागण्यासाठी २० डिसेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यू. बी. हेजीब यांच्या कोर्टात आला होता. अपील कामकाजासाठी येऊन तो कागदपत्रावर पोहोच मागत होता. त्या वेळी पोहोच देता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले असता, त्याने सोबत आणलेली कुºहाड बाहेर काढली. न्यायाधीश हेजीब यांनी न्यायालयात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाºयांना बोलावले. १० ते १५ मिनिटांनी पोलीस पोहोचले तसेच पोलिसांनी या वेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
ही बाब पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी असल्याने पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पाचही जणांना निलंबित केले. यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी व्यंकटेश बंदगी हा आरोपी कुºहाड घेऊन आला होता. या वेळी हलगर्जीपणा केला म्हणून एका महिला पोलिसास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दुसºयांदा हा प्रकार घडला आहे.
कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली. ड्युटीवरील कर्मचाºयांनी सजगता दाखवायला हवी होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सोलापूरचे पोलीस आयुक्त महोदव तांबडे यांनी सांगितले.