सोलापूर जिल्ह्यातील ‘दूध पंढरी’च्या येणेबाकीसाठी न्यायालयीन लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:25 PM2018-03-13T13:25:32+5:302018-03-13T13:25:32+5:30
साडेपाच कोटी थकबाकी, जिल्हाभरातील ५२६ दूध संस्था, गाय खरेदी व अन्य बाबींसाठी दिलेली अनामत वसुलीसाठी ५२६ संस्थांवर दावे दाखल केले आहेत.
सोलापूर: दूध दराच्या कोंडीमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाला दिलेले पैसे वसुलीसाठी न्यायालयामार्फत झगडावे लागत आहे. गाय खरेदी व अन्य बाबींसाठी दिलेली अनामत वसुलीसाठी ५२६ संस्थांवर दावे दाखल केले आहेत.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ(दूध पंढरी) जिल्ह्यात सर्वात मोठा सहकारी संघ आहे. जिल्हाभरात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करुन वाड्यावस्त्यांवर दूध संकलन दूध संघामुळे सुरू झाले; मात्र खासगीकरणाच्या निर्णयानंतर वाढलेल्या स्पर्धेत दूध पंढरीकडून कर्ज उचलून गाय, पशुखाद्य व अन्य कामासाठी अनामत उचलणाºया अनेक संस्थांनी सोलापूर जिल्हा सहकारी संघाला दूध घालणे बंद केले.
एकीकडे दूध संघाचे देणे असताना खासगी संघाला दूध पुरवठा सुरू केला; मात्र संघाची येणेबाकी भरली नाही. यावर सोलापूर जिल्हा दूध संघाने सहकार न्यायालयात अशा ५२६ संस्थांवर कलम ९१ अन्वये वसुलीसाठी दावे दाखल केले. या संस्थांकडे संघाची ५ कोटी ४० लाख २० हजार १८१ रुपये इतकी येणेबाकी आहे.
दावा दाखल केलेल्यांपैकी ३२२ संस्थांच्या विरोधात म्हणजे दूध संघाच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिले असून ३ कोटी ५१ लाख ४३ हजार ३५३ रुपये इतकी मूळ रक्कम व त्यावर १२ टक्के व्याज दावा दाखल तारखेपासून शिवाय दाव्यासाठी झालेला खर्चही वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित २०४ संस्थांकडील येणेबाकीसाठी न्यायालयातील दाव्यावर सुनावणी सुरू असून लवकरच यावरही निर्णय होईल असे सांगण्यात आले.
६७ संस्थांवर गुन्हे दाखल
- - अनामत रक्कम घेतलेल्या व दूध संघाला दूध पुरवठा बंद केलेल्या ६७ संस्थांचे चेअरमन व सचिवावर एक कोटी १७ लाख ५ हजार १९ रुपये वसुलीसाठी पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस कारवाई करुन ही रक्कम वसुलीची प्रक्रिया राबवली जात आहे.
- - न्यायालयीन लढाई असलेल्या संस्थांपैकी काहींनी मार्च १७ पर्यंत ४५ लाख ८४ हजार ८४२ रुपये व एप्रिल १७ पासून मागील महिन्यापर्यंत ९ लाख ८८ हजार ८१७ रुपयांचा भरणा केला असल्याचे संघाकडून सांगण्यात आले.
- - २०१० पासून दूध संघाने जिल्हाभरातील दूध संस्थांना गाय खरेदी, पशुखाद्यसाठी अनामत ७० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यापैकी गाय खरेदीसाठी ५५ कोटी तर १५ कोटी रुपये पशुखाद्य व अन्यसाठी दिले होते. ही रक्कम दूध संघाने बँकांकडून व्याजाने घेतली आहे.
- - न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित संस्थांकडून वसुलीसाठी प्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. बºयाच संस्था वसुलीसाठी सहकार्य करीत असल्या तरी ज्या संस्था सहकार्य करीत नाहीत त्या संस्थांच्या पदाधिकाºयांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची कार्यवाही सुरू आहे.
खासगी संघापेक्षा चांगल्या सुविधा दिल्या, दूध वाढीसाठी संस्थांच्या मागणीप्रमाणे कर्ज काढून पैसे दिले. अनेक संस्थांनी प्रामाणिकपणे पैसे भरले व दूध संघालाच दूध घातले. अनेक संस्थांनी आमचे देणे असतानाही खासगी संघाला दूध पुरवठा सुरू केला.
- सतीश मुळे,
व्यवस्थापकीय संचालक, दूध पंढरी