जम्बो कोविड सेंटरमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:01+5:302021-05-08T04:23:01+5:30
बार्शी शहर व तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना बेड ...
बार्शी शहर व तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. रुग्णांची ही गरज ओळखून राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते आ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने बार्शीतील लातूर बायपास रोडवर असलेल्या त्यांच्या जेएसपीएम संस्थेच्या भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये १ हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.
यावेळी प्रा. तानाजी सावंत,आ. राजेंद्र राऊत, माजी आ. दिलीप सोपल, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, भाजप नेते राजेंद्र मिरगणे, स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, तहसीलदार सुनील शेरखाने, प्रा. शिवाजी सावंत, धनंजय सावंत, केशव सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, दत्तात्रय साळुंखे यांच्यासह बार्शी तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांसाठी सोयीचे मध्यवर्ती ठिकाण
या कोविड सेंटरमुळे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेचा भार कमी होईल. बार्शी हे वैद्यकीय उपचारासाठी सोयीचे असून उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांनादेखील उपचारासाठी बार्शीत यावे लागते. या सेंटरसाठी आम्ही मध्यवर्ती आणि सर्वांच्या सोयीचे असे ठिकाण निवडले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये संपूर्ण आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार असल्याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.रामचंद्र घोगरे यांच्या नेतृत्वाखाली टीम या कोविड सेंटरचे काम पाहणार आहे.
----