कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली अन् पुढे काय घडलं?
By Appasaheb.patil | Published: November 21, 2023 10:10 PM2023-11-21T22:10:17+5:302023-11-21T22:10:30+5:30
सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या संवेदनशिलतेने कर्मचारी भारावले
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना कार्यालयात दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना मंगळवारी पक्षघाताचा झटका आला. त्यानंतर सीईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत हाॅस्पीटलमध्ये भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.
दरम्यान, कुटुंबप्रमुख म्हणून सीईओ यांनी दाखविलेले संवेदनशीलतेमुळे कर्मचारी यांच्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना कार्यालयात दैनंदिन कामकाज करताना पक्षघाताचा झटका आला. दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ व त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने उजव्या हात पायात ताकद कमी झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती सीईओ यांचे स्वीय सहाय्यक देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संध्याकाळी अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अग्रवाल यांच्याशी अर्धा तास बसून चर्चा केली. आपल्या जिल्हा परिषदेच्या कुटुंबातील एका सदस्यावर झालेल्या आघातावर त्यांनी अत्यंत संवेदनशीलता बाळगुन आज हॉस्पिटल येथे येऊन कर्मचाऱ्याची विचारपूस केल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्यावतीने समाधान व्यक्त केले जात आहे.